काठमांडू व सागा (चीन) येथे अडकलेल्यांच्या मदतीसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू

- Advertisement -


मुंबई, दि.२८: नेपाळमधील काठमांडू व चीनमधील सागा (चीन) येथे पर्यटन साठी गेलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे प्रयत्न सुरू असून यादृष्टीने केंद्र सरकार, नेपाळ व चीन सरकारच्या माध्यमातून कार्यवाही करत असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार रायगड, अहिल्यानगर, नागपूर यासह अनेक ठिकाणचे नागरिक सुरक्षितरित्या परत येत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सचे टूर ऑपरेटर दर्शन गुंजाळ यांनी ४५ जणांच्या ग्रुपमध्ये अहिल्यानगर (२७), नाशिक(१२), पुणे(५), मुंबई (१) जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती दिली. हा ग्रुप नेपाळ येथील चितवन येथे आहे. सर्वजण सुखरूप आहे. सदर ग्रुप नेपाळमधील लुंबिनी येथे पोहोचणार आहे. लुंबिनी येथे मुक्काम करून उद्या आयोध्याकडे निघणार असल्याचे श्री गुंजाळ यांनी कळविले आहे.

ट्रॅव्हल्सच्या निर्मलाताई गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रुप नेपाळमध्ये आहे. सर्व नागरिक सुखरूप आहेत.सद्यस्थितीत काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्यामुळे ते लुंबिनीकडे जाणार असून तेथून पुढे आयोध्याकडे जाण्याचे त्यांचे नियोजन आहे. सद्यस्थितीत त्यांना शासन स्तरावरून मदतीसाठी प्रयत्न केले जात आहे.

रायगड जिल्ह्यतील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने ३७ व्यक्ती नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेल्या आहेत. सध्या सर्व जण सागा (चीन ) येथे सुरक्षित आहेत. त्यांचे काठमांडू येथून २९ रोजी भारतात परतण्यासाठी विमान आहे. सर्व जण पर्यायी मार्गाने काठमांडूकड़े आज सकाळी रवाना झाले असून सायंकाळ पर्यंत काठमांडू एअरपोर्टला पोहचतील. ते उद्या येतील, अशी माहिती नातेवाईक दिलीप शेठ यांनी दिली आहे. सर्वांची तब्येत ठीक असून त्यांच्यापैकी दोघे डॉक्टर आहेत.

नागपूर जिल्ह्यातील सर्व १०६ नागरिक सुखरूप असून, नागपूर जिल्हा प्रशासन यांचा त्यांच्याशी सातत्याने संपर्क असून त्यांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासाबाबत आवश्यक समन्वय व देखरेख करण्यात येत आहे. त्यापैकी ४ नागरिक विमानाने दिल्ली येथे सुखरूप पोहोचले असून, उर्वरित १०२ नागरिक बसमार्गे भारतात दाखल झाले आहेत. १०२ नागरिक बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यात असून, आज रात्री ते पटना येथे पोहोचून तेथे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर उद्या २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या रेल्वेने पटना येथून नागपूरकडे रवाना होणार आहेत.

वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्ती नेपाळ मध्ये अडकलेल्या असल्याबाबतची माहिती अद्याप पर्यंत प्राप्त झालेली नाही.

नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील ११ नागरिक काठमांडू येथे असून त्यांना मदतीसाठी आवश्यक असल्याने प्रयत्न केले जात आहेत.

नागरिकांना आवाहन

या पार्श्वभूमीवर, नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 माहिती नोंदवण्यासाठी लिंक:

https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आला आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून मदतीसाठी १०७० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

००००

किरण वाघ/ वि.स.अ



Source link

- Advertisement -