छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- सुधारित वितरण क्षेत्र योजना तसेच वितरण हानी कमी करण्यासाठी योजनांच्या कामांना गती द्यावी असे निर्देश खा. संदिपान भुमरे यांनी आज दिले. विविध योजनांतील कामांची माहिती संबंधित संसद सदस्य व विधिमंडळ सदस्यांना नियमित द्यावी, असेही खा. भुमरे यांनी सांगितले.
जिल्हा विद्युत समितीची बैठक खा.संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या परिमंडल कार्यालयात आज पार पडली. बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील वीजविषयक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण तसेच वीजगळती कमी करण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी समितीचे सहअध्यक्ष खा.डॉ.कल्याण काळे, सदस्य तथा नवीन व नवीकरणीय ऊर्जा, ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आ.अंबादास दानवे, आ.सुहास सिरसाठ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, आ.प्रशांत बंब, आ.रमेश बोरनारे, आ.विलास भुमरे, आ.संजना जाधव, समितीचे संयोजक तथा महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, मनीष ठाकरे, बीना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता कुमठेकर यांनी शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध योजनांतील कामांची माहिती दिली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०अंतर्गत ४० वीज उपकेंद्रांत पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ प्रस्तावित आहे. त्यापैकी २९ उपकेंद्रांत क्षमतावाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मरची १८ पैकी ५ कामे पूर्ण झाली असून ७ कामे प्रगतिपथावर आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० अंतर्गत जिल्ह्यात ११० उपकेंद्रांवरील ७४३ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी ४८ उपकेंद्रांच्या ३१३ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प पूर्ण होऊन तेथील कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे.
घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी म्हणून सुरू असलेल्या पीएम-सूर्यघर योजनेत जिल्ह्यातील ४८ हजार ९५० ग्राहकांनी १७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घरावर उभारले आहेत. दारिद्र्यरेषेखालील ग्राहक व १०० युनिटपेक्षा दुर्बल आर्थिक घटकातील ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वंयपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (स्मार्ट) योजना सुरू करण्यात आली आहे. स्मार्ट योजनेत जिल्ह्यातील १२ हजार ३९७ ग्राहकांना सौर ऊर्जा संच बसवण्याचे लक्ष्य आहे. यात बीपीएल ग्राहकांना २ हजार ५०० रुपये, एससी-एसटी ग्राहकांना ५ हजार रुपये तर सर्वसाधारण दुर्बल घटकातील ग्राहकांना केवळ १० हजार रुपयांत १ किलोवॅट सौर ऊर्जा संच बसवून २५ वर्षे मोफत वीज मिळवण्याची संधी आहे. या दोन्ही योजनांचा चांगला प्रसार करावा, असे खा.भुमरे यांनी सांगितले.
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत प्रलंबित अर्ज निकाली काढा, अतिभारित रोहित्रांच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्रे बसवा, शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करा, अशा सूचना खा. भुमरे यांनी केल्या
सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेऊन योजनांना गती देण्यासाठी व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कायम तत्पर राहील, असे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले. बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नाहटा, प्रेरणा बनकर, गिरीश गायकवाड, प्रसाद महातोले, महेंद्र देशमुख, विनय घनबहादूर, अशोक जाधव, रमेश वाघचौरे, अविनाश राऊत उपस्थित होते.
००००
















WhatsApp