मुंबई,दि.३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी एकूण ६ कोटी ८३ लाख १ हजार ८८७ रुपये अनुदान मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने निर्गमित केला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात विशेष पाठपुरावा केल्याचेही मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे नरडवे, जांभळगाव, भैरवगाव, यवतेश्वर आणि दुगनगर ही पाच गावे बाधित झाली आहेत. एकूण ९६१ प्रकल्पबाधित कुटुंबांपैकी १५२ कुटुंबांनी स्वेच्छा पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारला आहे.मंजूर अनुदानामध्ये घरांसाठी ६ कोटी ५५ लाख १५ हजार ७२० रुपये, तर जमिनीबाबत २७ लाख ८६ हजार १६७ रुपये अनुदानाचा समावेश आहे. नरडवे येथील ८४, जांभळगाव येथील १६, भैरवगाव येथील २, यवतेश्वर येथील ४ आणि दुगनगर येथील ४६ कुटुंबांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
मंजूर अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्यासोबतच नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम नियोजनानुसार पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यांना न्याय व वेळेत मदत मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. या निर्णयामुळे १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेलाही गती मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले
0000
संध्या गरवारे/विसंअ
















WhatsApp