धुळे, दि. ५ (जिमाका) : धुळे जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग हे केवळ दळणवळणाचे मार्ग नसून उद्योग, व्यापार, शेती आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे महत्त्वाचे दुवे आहेत. त्यामुळे महामार्गांची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. विशेषतः अपघातप्रवण ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अंडरपास, उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांची कामे वेगाने मार्गी लावावीत. त्याचबरोबर भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन प्रस्तावित महामार्ग प्रकल्पांच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे प्रकल्प अंमलबजावणी युनिटअंतर्गत सुरू असलेल्या तसेच सन 2026-27 मध्ये प्रस्तावित विविध महामार्ग प्रकल्पांचा पालकमंत्री रावल यांनी बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार,सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.

महामार्गांवरील वेगवान वाहतुकीसोबतच स्थानिक नागरिकांची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगत पालकमंत्री रावल यांनी अपघातप्रवण ठिकाणांवर तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर दिला. पळासनेर, वाघाडी आणि सांगवी येथे अंडरपास उभारण्यासह दोन ब्लॅकस्पॉट आणि सात अपघातप्रवण ठिकाणी सुधारात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. सुमारे 2.988 किलोमीटरच्या या कामासाठी ₹64.91 कोटी खर्च अपेक्षित आहे. ही कामे पूर्ण करताना स्थानिक नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था उपलब्ध होईल आणि अपघातांचा धोका कमी होईल, यादृष्टीने कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
फागणे ते पारोळा चौफुली हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने त्याच्या मजबुतीकरण आणि चौपदरीकरणाचे कामही वेगाने पूर्ण करावे, असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. 5.29 किलोमीटर लांबीच्या या कामासाठी ₹35.81 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी कामाचा दर्जा राखण्याबरोबरच ते निर्धारित कालावधीत पूर्ण होईल, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
धुळे शहर आणि लगतच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसआरपीएफ धुळे, अकलाड-मोराणे आणि तामसवाडी येथील अंडरपासची कामे महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले. या तीन ठिकाणी अंडरपाससह इच्छापूर गावाजवळ सर्व्हिस रस्त्याचे काम करण्यात येणार असून 4.36 किलोमीटरच्या या कामासाठी ₹73.10 कोटी खर्च अपेक्षित आहे. महामार्गावरील मुख्य वाहतुकीला अडथळा न आणता स्थानिक नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ ये-जा करता येईल, अशा पद्धतीने या कामांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
साक्री-शेवाळी जंक्शनवरील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने तेथील प्रस्तावित उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोडच्या कामाला गती द्यावी, असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. 1.92 किलोमीटर लांबीच्या या कामासाठी ₹42.10 कोटी खर्च अपेक्षित आहे. उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यामुळे मुख्य महामार्गावरील तसेच स्थानिक वाहतूक सुरक्षित व सुरळीत होईल, यासाठी कामाचे योग्य नियोजन करून ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-मध्यप्रदेश सीमा हा प्रस्तावित महामार्ग जिल्ह्याच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याने या प्रकल्पाच्या कार्यवाहीला विशेष प्राधान्य द्यावे, असे पालकमंत्री श्री. रावल यांनी निर्देशित केले. कुसुंबा ते महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेपर्यंत सुमारे 165 किलोमीटर लांबीचा चारपदरी प्रवेश नियंत्रित राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे ₹2 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. यामध्ये ₹300 कोटी भूसंपादनासाठी, तर ₹1 हजार 700 कोटी बांधकामासाठी प्रस्तावित आहेत.
या महामार्गामुळे कुसुंबा, दोंडाईचा परिसरासह जिल्ह्याच्या उत्तर भागाची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. शेतमाल आणि औद्योगिक मालाच्या वाहतुकीसह मध्यप्रदेशच्या दिशेने दळणवळण अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे सविस्तर प्रकल्प अहवालासह आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करावा, असे पालकमंत्री रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
महामार्गांमुळे मोठ्या शहरांची कनेक्टिवीटी वाढत असताना महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी स्पष्ट केले. त्यादृष्टीने सरवड फाटा, गोराणे फाटा आणि सावळदे फाटा येथे प्रस्तावित अंडरपासच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल वेगाने पूर्ण करावा. या कामांचा डीपीआर सध्या प्रगतिपथावर आहे. स्थानिक नागरिकांची ये-जा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव लवकर पुढील टप्प्यावर न्यावेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जळगाव ते नाशिक या सुमारे 200 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रस्तावाचाही पालकमंत्री श्री. रावल यांनी आढावा घेतला. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांना जोडणाऱ्या या मार्गामुळे प्रादेशिक दळणवळण अधिक सक्षम होणार असल्याने त्यासंबंधी आवश्यक कार्यवाही आणि पाठपुरावा गतिमान ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महामार्ग प्रकल्पांमध्ये कामांचा वेग, दर्जा आणि नागरिकांची सुरक्षितता या तिन्ही बाबींना समान प्राधान्य द्यावे, असे अधोरेखित करत पालकमंत्री रावल यांनी प्रत्येक सुरू असलेल्या कामाचा नियमित आढावा घ्यावा, प्रलंबित अडचणी संबंधित विभागांच्या समन्वयातून तातडीने सोडवाव्यात आणि प्रस्तावित प्रकल्पांच्या मंजुरीसाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्याच्या भविष्यातील वाहतूक आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गांची कामे नियोजनबद्ध आणि कालबद्ध पद्धतीने मार्गी लावावीत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
०००
















WhatsApp