पनवेल :पुणे येथे एमटी विभागात डीआयजी पदावर असलेले निशिकांत मोरे यांच्यावर अश्लील वर्तन केल्यामुळे 26 डिसेंबर रोजी पोस्कोअंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाला वेगळे वळण लागले असून संबंधित फिर्यादी तरुणी घरातून बेपत्ता झाली आहे. यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात हरवलेली व्यक्ती अल्पवयीन असून त्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
6 जानेवारीला रात्री 11.30 वाजताच्या सुमारास संबंधित तरुणी घरातून निघून गेली. यावेळी या तरुणीने आपल्या बेडरूममध्ये एक नोट ठेवली आहे. डीआयजी निशिकांत मोरे यांच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला असल्याचे या नोटमध्ये लिहण्यात आले आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या आत्महत्येला डीआयजी मोरे जबाबदार असतील असे या नोटमध्ये लिहण्यात आले आहे.
तरुणीचा शोध सुरु
संबंधित घटनेची दखल घेत पोलिसांमार्फत तरुणीचा शोध सुरु करण्यात आला आहे. याकरिता सहा पथक स्थापन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्य अशोक दुधे यांनी दिली.
अटकपूर्व जामिनासाठी डीआयजीचे प्रयत्न
या प्रकरणात अटक टाळण्यासाठी डीआयजी निशिकांत मोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याकरिता पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आल्याचे समजते.