खादीचे कपडे अन् खिशावर डोळा, मंत्र्यांच्या रॅलीत चोर

- Advertisement -

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वागत रॅलीत खादीची पांढरी शुभ्र कपडे घालुन तीन चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या तीन आरोपींना कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे.

चोरट्यांनी रॅलीत मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मागेपुढे करीत गर्दीचा फायदा घेत काही जणांच्या गळ्यातील चेन, पैशाची पाकिटे हातचलाखीने लांबवली होती. या भामट्यांचा पर्दाफार्श कराड पोलिसांनी मोठ्या शिताफीने केला. बीड जिल्ह्यातील गांधीनगर परिसरातील तिघांना शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वेशांतर करुन ताब्यात घेतले. संबंधितांकडुन सोने, रोख रक्कम असा २ लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव यांनी दिली.

खादीची पांढरी कपडे घालुन, ओळख नसतानाही मंत्री, खासदार यांच्या निघालेल्या रॅलीत त्यांच्या मागेपुढे करत चांगली लोक हेरुन त्यांच्या गळातील चेन, पाकीट लांबवणाऱ्याच्या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या होत्या. शहर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस रेकॉर्डवरील चोरटे व अन्य संशयीतांची कसुन चौकशी केली. अखेर रॅलीतील चित्रीकरणाचा अभ्यास केला. चित्रीकरणातुन अनोळखी चेहरे हेरुन संबंधितांचा शोध सुरु केला. त्यासाठी त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन संबंधित संशयीतांची माहिती घेतली.

गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, हवालदार जयसिंग राजगे, सचिन साळुंखे, संजय जाधव हे संशयीतांच्या शोधासाठी बीडला गेले. तेथे संबंधितांचा शोध वेशांतर करुन घेतला. संशयीतांना बीड पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. संबंधित संशयीतांना पहिल्यांदा चोरी केली नसल्याचे सांगितले.पोलिसी खाक्या दाखवताच संशयीतांनी चोरलेले सोनं आणि रोख रक्कम गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -