अमरावती : जिल्ह्यात जून २०२० पर्यंत मुदत संपणाऱ्या ५२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मार्चमध्ये सरपंच आरक्षणाची सोडत निघेल. या पार्श्वभूमीवर मतदार यादीचा कार्यक्रम सुरू असल्याने गावागावांतील राजकारण तापले आहे.
जिल्हा निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, ५२६ ग्रामपंचायतींमध्ये १४ लाख ४३ हजार ६८३ लोकसंख्या आहे. यामध्ये २ लाख ४८ हजार ९८३ अनुसूचित जाती व ३ लाख ३७ हजार ७९१ अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. १९७२ प्रभागांमध्ये ५३१९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात राखीव १००० जागांपैकी ५३१ महिलांसाठी राखीव आहेत.
अनुसूचित जमातीसाठी १२०१ जागा राखीव आहेत. यापैकी ६१० जागा महिलांसाठी, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण ११७० जागा आहेत. यामध्ये ६११ जागा महिलांसाठी आहेत. सर्वसाधारण प्रवर्गात १९४८ सदस्यपदे आहेत. यापैकी ११९४ महिलांसाठी राखीव असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
अमरावती तालुक्यात ४६, तिवसा २६, भातकुली ३४, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ५३, नांदगाव खंडेश्वर ४४, दर्यापूर ४८, धारणी ३२, चिखलदरा १७, चांदूर बाजार ४१, अचलपूर ४२, मोर्शी ३९, वरूड ४१ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
जिल्ह्यातील ६३ टक्के गावांत निवडणूक
जिल्ह्यातील ८३९ पैकी ५२६ ग्रामपंचायती म्हणजेच ६३ टक्के गावांमध्ये निवडणूक ज्वर तापला आहे. सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा होत आहे. मार्च महिन्यात गावगावांत रणधुमाळी उडणार आहे.