तांदळाचे मोफत वितरण- जिल्हाधिकारी राम

- Advertisement -

पुणे- देशातील कोरोना विषाणू (COVID-१९) प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासनाच्या दिनांक ३०.३.२०२० व महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ३१.३.२०२० रोजीच्या आदेशान्वये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिल ते जुन, २०२० या कालावधासाठी अनुज्ञेय असलेल्या नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति माह ५ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

ते म्हणाले, यासाठी सर्वप्रथम १.४.२०२० पासून एप्रिल महिन्याचे नियमित ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ प्रति माणसी रूपये २ प्रति किलो दराने गहू व रूपये ३ प्रति किलो दराने तांदूळ, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटाला तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रति शिधापत्रिका रूपये २ प्रति किलो दराने गहू व रूपये ३ प्रति किलो दराने तांदूळ वितरीत करण्यात येत असून आतापर्यंत ८३.३५% शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत दिनांक ८.४.२०२० पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA) प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय अन्न योजना लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रति माणसी ५ किलो मोफत तांदूळ माहे एप्रिल २०२० मध्ये वाटप सुरू करण्यात आले आहे. व तशीच कार्यवाही माहे मे व जून, २०२० मध्ये अंवलबण्यात येईल, असे ते म्हणाले.

शासनाने दि. ९.४.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतलेल्या निर्णयानुसार ज्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश अंत्योदय अन्न योजना अथवा अन्नसुरक्षा योजना यामध्ये करण्यात आलेला नाही अश्या सर्व केशरी कार्ड धारकांना तसेच ज्या पात्र शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल न केल्यामुळे त्यांची शिधापत्रिका ऑनलाईन मधून वगळली गेली असल्यास अथवा ज्यांची शिधापत्रिका अद्याप ऑनलाईन करण्यात आली नाही अश्या सर्व शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात म्हणजेच गहू रूपये ८ प्रति किलो, तांदूळ रूपये १२ प्रति किलो याप्रमाणे प्रति व्यक्ती ५ किलो (३ किलो गहू, २ किलो तांदूळ) धान्य माहे मे २०२० व जून २०२० या दोन महिन्या करिता वितरित करण्यात येणार आहे. हे लाभार्थी दिनांक १ मे २०२० पासून त्यांना देय धान्य रास्तभाव दुकानांतून घेऊ शकतील.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) नियमित अन्नधान्याची उचल केलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच मोफत तांदूळ अनुज्ञेय आहे.

वाटप योग्यप्रकारे होण्यासाठी व गर्दी होऊ नये म्हणून अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८.०० ते रात्री ८.०० उघडी ठेवण्याकरिता आदेशीत केलेले आहे. अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून ई-पॉस मशीनद्वारे तांदळाचे वितरण मोफत करणे अनिवार्य राहिल. तसेच सवलतीच्या दरात केशरी शिधापत्रिकाधारकांना वितरण करण्यात येणाऱ्या धान्याची नोंद नोंदवहीत घेऊन लाथार्थ्याची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.
शिधापत्रिकाधारकांनी स्वत:हून त्यांचे धान्य सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून प्राप्त करून घ्यावे.

अन्नधान्यापासून एकही शिधापत्रिकाधारक वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्वाना देण्यात आलेल्या आहेत. तसेच अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानासमोर गर्दी करू नये, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे.

- Advertisement -