Home ताज्या बातम्या घराबाहेर पडू नका, आमची तुमच्यावर नजर आहे… होम क्वॉरंटाईन असणाऱ्यांवर CQMS ॲपच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाची डिजिटल शार्प नजर

घराबाहेर पडू नका, आमची तुमच्यावर नजर आहे… होम क्वॉरंटाईन असणाऱ्यांवर CQMS ॲपच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाची डिजिटल शार्प नजर

0

करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतूदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 03 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.    

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. जिल्हा प्रशासनाने आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती संकलित केली आहे.  रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास सात हजार नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. 

होम क्वॉरंटाईन केलेले नागरिक नियम मोडून घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या पुढाकारातून CQMS हे ॲप तयार करण्यात आले आहे तर या कामाचे संपूर्ण संनियंत्रण अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे करीत आहेत.  

या ॲपच्या माध्यमातून जीपीएसद्वारे होम क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तींना ट्रॅक करण्यात येत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसला आहे. कॅलिब्री टेक्नॉलॉजी या कंपनीकडून प्रशासनाने सीक्यूएमएस हे ॲप तयार केले आहे.  यामध्ये होम क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तींची मोबाईल क्रमांकासह संपूर्ण माहिती संगणकात संग्रहित करण्यात आली आहे.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष आणि कॉल सेंटर तयार करण्यात आले आहे.  कॉल सेंटरमधील कर्मचारी होम क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तीस मोबाईलवर फोन करुन सीक्यूएमएस या ॲपची लिंक मोबाईलवर पाठवत आहेत. हे ॲप मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगून ओटीपीद्वारे सुरु करण्यास सांगत आहेत.

            होम क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तींच्या मोबाईलवरील जीपीएस ॲक्टिव्ह होऊन त्यांच्या प्रत्येक हालचालींवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जात आहे.  या ॲपमुळे होम क्वॉरंटाईन व्यक्ती घरातून बाहेर पडून कुठे कुठे गेली आहे, याची माहिती प्रशासनाला जीपीएसद्वारे मिळत आहे. बिनकामाचे घराबाहेर पडणाऱ्यांना तातडीने अलिबाग येथील कॉल सेंटरमधून फोन जात आहेत. घराबाहेर पडू नका, आमची तुमच्यावर नजर आहे, असे संबंधिताला सांगण्यात येत आहे. होम क्वॉरंटाईन केलेल्या प्रत्येक व्यक्तीला फोन करुन हे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. जे ॲप डाऊनलोड करीत नाहीत त्यांच्या घरी शासकीय कर्मचारी पाठवून हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत संकलित झालेल्या या माहितीचा उपयोग सीक्यूएमएस ॲपसाठी उपयुक्त  ठरत आहे.