पळवेत वन्यप्राण्यांसाठी शेतकरी संस्थेतर्फे होतोय पाणीपुरवठा

- Advertisement -

सुपा : पारनेर तालुक्‍यातील पळवे येथील शेतकरी कल्याणकारी संस्थेच्यावतीने वन्य प्राण्यांसाठी मोफत पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसापासून केला जात आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय ठुबे, उपाध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे यांच्यासह संस्थेचे सदस्य यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

नगर-पुणे महामार्ग पासून तीन किमी अंतरावरील पळवे-भोयरे गांगर्डा रस्त्यालगत पंढरीनाथ सोनवणे यांच्या मालकीच्या शेतात वन्यप्राण्यांसाठी हौद तयार करण्यात आला आहे. या हौदांमध्ये वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा साठा केला जात आहे. याकामी मदत म्हणून संस्थाध्यक्ष ठुबे हे आपल्या मालकीच्या ट्रॅक्‍टरने मोफत पाणीपुरवठा करत आहेत. याकामी पळवे ग्रामपंचायत देखील वन्यप्राण्यांना पाणीपुरवठा करीत आहे. याशिवाय हौशीराम ठुबे यांनीही आपल्या शेतामध्ये वन्यप्राण्यांसाठी चारी काढली आहे.

या चारीमध्ये चोवीस तास पाणी भरून ठेवण्याचे काम ते करत आहेत. पळवे परिसरात भोयरे गांगर्डा, कडूस, नारायणगव्हाणमध्ये वनखात्याची जमीन असल्याने या ठिकाणी डोंगर परिसर आहे. याठिकाणी वन्य प्राण्यांमध्ये हरीण, ससे, कोल्हे, लांडगे आदींसह पशुपक्ष्यांचे मोठे वास्तव्य आहे. विहिरी, बोरवेल, तलाव, केटीवेअरने तळ गाठल्याने हे प्राणी मध्यंतरी लोकवस्तीकडे येऊ लागले होते.

अनेक प्राण्यांना नगर-पुणे महामार्गावर प्राण गमवावे लागले, तर काहींना कायमचे अपंगत्व आले. यावेळी दैनिक प्रभातमध्ये वन्यप्राण्यांच्या पाण्यासाठी संस्था, वन्यप्रेमींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय ठुबे, पंढरीनाथ सोनवणे, राजेंद्र कळमकर, दादाभाऊ दिवटे परिश्रम घेत आहेत.

- Advertisement -