नागपूर : साधारणत: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध बैठकांमध्ये सदस्यांसाठी चहा, नाश्ता बोलविण्यात येतो. यासाठी विशेष निधी राखीव असतो. मात्र चहा, कॉफीच्या या देयकात मोठे गोलमाल होत असल्याची शंका खुद्द कुलगुरूंनाच आली आहे. अभ्यास मंडळाच्या एका बैठकीत केवळ तीन सदस्यांनी ९९ कप चहा व २५ कॉफीचे सेवन केले व तसे देयकच वित्त विभागाकडे आले. विद्यापीठात अशी आणखी प्रकरणे आहेत का व यामागे नेमका दोषी कोण, याचा शोध घेण्यात येणार आहे.
नागपूर विद्यापीठाच्या विद्याशाखा विभागात मे महिन्यात अभ्यास मंडळाच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या तीन सदस्यांना विद्याशाखेकडून चहा देण्यात आला. चहा, कॉफी, नाश्त्याचा एकूण खर्चच दीड लाख रुपयांच्या घरात दाखविण्यात आला. ही बाब वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्यासमोर आल्यावर त्यांनी तत्काळ डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना याची सूचना दिली. कुलगुरूंनी तत्काळ ही देयके थांबविली असून, संबंधित विभागाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. प्रत्येक विभागाला बैठकांमधील अवांतर खर्चासाठी अग्रीम रक्कम देण्यात येते व त्यातून खर्चाचे देयक सादर करावे लागतात. परंतु संबंधित बैठकीतील खर्च हा फार जास्त प्रमाणात आहे.
कुलगुरूदेखील आश्चर्यचकित
यासंदर्भात कुलगुरू डॉ.काणे यांना विचारणा केली त्यावेळी त्यांनीदेखील यासंदर्भात आश्चर्य व्यक्त केले. बैठकांमध्ये येणाºया सदस्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते. परंतु केवळ एका बैठकीत तीन सदस्य इतका प्रचंड प्रमाणात चहा-कॉफी पिणे शक्य नाही. यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करण्यात येईल व नेमके तथ्य शोधण्यात येईल. कुणी दोषी आढळले तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर विद्यापीठ : एकाच बैठकीत तिघांकडून ९९ कप चहांचे सेवन?
- Advertisement -