Home शहरे मुंबई बीकेसीत चेंगराचेंगरी

बीकेसीत चेंगराचेंगरी

0
बीकेसीत चेंगराचेंगरी

[ad_1]

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एकीकडे रुग्णसंख्येचा स्फोट घडत आहे; तर दुसरीकडे खाटा मिळत नाहीत, ऑक्सिजन, औषधे आणि लशींचा तुटवडा यामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी लशींचा मुबलक साठा आल्याचे समजताच शहरातील सर्वच केंद्रांवर प्रचंड गर्दी झाली. या गर्दीमुळे आपल्याला लस मिळणार नाही या भीतीने महापालिकेच्या बीकेसी लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.

वांद्रे-कुर्ला सेंटर (बीकेसी) येथे पालिकेने लसीकरण केंद्र सुरू केले असून, तिथे दररोज खूप मोठी गर्दी असते. बुधवारी सकाळपासून इथे गर्दीचा महापूर लोटला आणि इथली व्यवस्था कोलमडली. या केंद्रावर दुपारी १२ नंतर लस दिली जाणार असतानाही लसीकरणासाठी सकाळपासून गर्दी झाल्याने झुंबड उडाली. त्यांनतर लसीकरण सुरळीत झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पण, त्यापूर्वी इथे निर्माण झालेली परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दृश्य निर्माण झाले होते. गर्दी, उन्हाचा त्रास आणि लस मिळते की नाही या भीतीने गर्दीचे नियंत्रण सुटले आणि कोलाहल सुरू झाला. त्यातून चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाल्याचे उपस्थितांचे म्हणणे आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने गर्दी नियंत्रणात आणण्याचा केलेला प्रयत्न तोकडा ठरला. इथली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली तरीही सुदैवाने कोणतीही दुर्घटना उद्भवली नाही.

‌मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरलेल्या लसीकरण मोहिमेचा वेग काही दिवसांपासून कमी झाला आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी रात्री पालिकेकडे एक लाख लशींचा साठा उपलब्ध झाल्याचे जाहीर होताच, बुधवारी लसीकरण केंद्रांवर तुफान गर्दी लोटली. ही गर्दी हाताळताना तिथल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.

राजवाडी रुग्णालय, दहिसर करोना केंद्र, बीकेसी करोना केंद्र, भगवती रुग्णालयासह सगळ्याच केंद्रांवर बुधवारी सकाळपासून गर्दी झाली होती. काही ठिकाणी ही गर्दी हाताबाहेर जाण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. लसीकरण केंद्रांवर गर्दी झाल्याने सकाळपासून उन्हातान्हात उभे राहिलेल्यांचे हाल झाले. त्यात ज्येष्ठ नागरिकांनाही बराच त्रास सहन करावा लागला. बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने तिथे जमलेल्यांमध्ये नाराजी होती. राजकीय पक्षांकडूनही तिथे कोणतीही सुविधा दिली जात नसल्याकडे अनेकांनी लक्ष वेधले. लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत गेल्याने तिथे जमलेल्यांचे आणि केंद्रावर ड्युटीवरील कर्मचाऱ्यांचे वाद झाल्याचे अनेक प्रसंग घडले. बराच वेळ रांगेत उभे राहूनही लस मिळण्यास उशीर होत असल्याने वाद वाढत गेले.

नोंदणीत चूक तरीही वाद

१८ ते ४४ वयोगटासाठी पूर्वनोंदणी करून पाच केंद्रावर लसीकरण झाले. यासाठी आदल्या दिवशी रात्री उपलब्ध कोटा खुला केला होता. मात्र, ४४ वयोगटावरील ज्या व्यक्तींनी यापूर्वी लस घेतली नाही, त्यांनीदेखील याच पद्धतीने नोंदणी केली. अशा अनेक व्यक्तींनी लस देण्याच्या मागणीसाठी रुग्णालयामध्ये जाऊन वाद घातला. तेव्हा, त्यांना ही सुविधा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तरीही त्यांचे समाधान होत नव्हते.

[ad_2]

Source link