हायलाइट्स:
- करोनाच्या दुसऱ्या लाटेतही धारावीचा यशस्वी लढा.
- सलग दुसऱ्या दिवशी करोनाचा एकही रुग्ण नाही.
- दोन जणांना डिस्चार्ज; सध्या फक्त ११ अॅक्टिव्ह रुग्ण.
वाचा: आनंदाची बातमी : ‘कोव्हॅक्सिन’चे लहान मुलांवर सकारात्मक परिणाम
मुंबईतील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत करोना संसर्ग नियंत्रणात आणणे ही सर्वाधिक आव्हानात्मक बाब आहे. असे असताना करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत आणि आता दुसऱ्या लाटेतही धारावीने नेटाने या संसर्गाशी लढा दिला आहे. मुंबई महापालिका अत्यंत नियोजनबद्धपणे धारावीत काम करत असल्यानेच त्याचे सकारात्मक परिणाम सातत्याने दिसत आहेत. त्यातूनच धारावी मॉडेलचं थेट जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कौतुक झालं आहे.
वाचा: धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटणार?; नगरविकास मंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश
करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत काल आणि आज असे सलग दोन दिवस दिलासादायक बातमी मिळाली. २ फेब्रुवारी रोजी धारावीत करोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यानंतर तब्बल साडेचार महिन्यांनी काल (१४ जून) धारावीत त्याची पुनरावृत्ती झाली. २४ तासांत एकाही नवीन करोना बाधिताची नोंद झाली नाही. त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा सुखद धक्का बसला. आजही महापालिकेच्या आकडेवारीत धारावीपुढे शून्यच राहिलं. धारावीसाठी आणि मुंबईसाठीही दुसऱ्या लाटेतील हा सर्वाधिक दिलासा ठरला आहे. धारावीत आतापर्यंत करोनाचे एकूण ६ हजार ८६१ रुग्ण आढळले असून त्यातील ६ हजार ४९१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. आजची स्थिती पाहिल्यास केवळ ११ सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून दोन रुग्ण आज करोनातून बरे झाले आहेत.
दरम्यान, करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ८ एप्रिल रोजी धारावीत ९९ रुग्णांसह उच्चांक नोंदवला गेला होता. त्यानंतर मे महिन्यापासून धारावीतील रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत असून ही घसरण आता शून्यावर आली आहे. धारावीत १ एप्रिल २०२० रोजी करोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला होता.
वाचा: यापुढे डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर उपचार नाही; आयएमएचा इशारा