हायलाइट्स:
- सैफ अली खानचा चित्रपट ‘भूत पोलिस’ पोस्टर रिलीजनंतर वादाच्या भोवऱ्यात
- ‘भूत पोलिस’च्या पोस्टरवर हिंदू साधू दिसल्यानं नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
- काही महिन्यांपूर्वीच सैफ अली खानची वेब सीरिज ‘तांडव’वरून झाले होते वाद
‘भूत पोलिस’ या चित्रपटाचं पोस्टर अभिनेत्री करिना कपूरनं ५ जुलैला तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं. काही दिवसांपूर्वीच करिनानं अधिक मानधन मागितल्याच्या मुद्द्यावरून ट्रोल केलं जात होतं. त्यानंतर आता ‘भूत पोलिस’च्या पोस्टरवरून करिनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खानवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. या पोस्टरवर सैफच्या मागच्या बाजूला हिंदू साधू दिसत असल्यानं नेटकऱ्यांनी या पोस्टरवर नाराजी व्यक्त केली आहे. असं करून निर्मात्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्माची खिल्ली उडवल्याचं काही युझर्सचं म्हणणं आहे.
मागच्या काही महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटांवर धार्मिक भावना दुखावत असल्याचे आरोप होताना दिसत आहेत. या आधी सैफ अली खानची वेब सीरिज ‘तांडव’ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यामध्ये एक भूमिका भगवान शंकरांच्या अवतारात दाखवल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. यातून हिंदू देवतांचा अपमान केल्याचं अनेकांनी म्हटलं होतं एवढंच नाही तर कलाकारांवरही टीका केली गेली होती. चित्रपटांमध्ये फक्त हिंदू देवी- देवता आणि संतांनाच टार्गेट केलं जातं असं म्हटलं गेलं होतं.
‘तांडव’ वेब सीरिजच्य वादानंतर आता सैफचा ‘भूत पोलिस’ हा चित्रपट याच कारणानं वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एवढंच नाही तर एका युझरनं या पोस्टरवरून थेट RSS चे संचालक मोहन भागवत यांनाच प्रश्न विचारला आहे. या युझरनं लिहिलं, ‘चित्रपट ‘भूत पोलिस’च्या पोस्टरवर हिंदू साधू का आहेत?’ या पोस्टरमध्ये सैफ काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. तर त्याच्या मागे दोन्ही बाजूला गाळ्यात माळा घेतलेले हिंदू साधू दिसत आहेत.