हायलाइट्स:
- महाराष्ट्रातील पूरस्थिती बिकट; बचावकार्य सुरू
- अजित पवारांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन
- सैन्यदलाची अधिकची मदत मिळण्याबाबत केली चर्चा
अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारनं मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात आहे, अशी माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली आहे.
वाचा: संकटांची मालिका सुरूच! साताऱ्यात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू
राज्यातील परिस्थितीवर अजित पवार जातीनं लक्ष ठेवून आहेत. संबंधित जिल्ह्यांतील सर्व लोकप्रितिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीनं देतानाच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना अजित पवारांनी मंत्री व लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत. कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळं धरणाची पाणीपातळी वाढत असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे.
वाचा: हे अनपेक्षित संकट! जीव वाचवण्याला पहिलं प्राधान्य; उद्धव ठाकरे पोहोचले मंत्रालयात
अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे, तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालीन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव व मदतकार्यात सहकार्य करावं. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.