Ambil Odha Anti Encroachment Drive: पुणे महापालिकेच्या ‘या’ कारवाईची चौकशी?; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

Ambil Odha Anti Encroachment Drive: पुणे महापालिकेच्या ‘या’ कारवाईची चौकशी?; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
- Advertisement -

हायलाइट्स:

  • आंबिल ओढा झोपडपट्टीवरील कारवाई बेकायदेशीर.
  • पुणे पालिकेच्या कारवाईची स्वतंत्र चौकशी करा.
  • मंत्री नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र.

मुंबई:पुणे शहरातील आंबिल ओढा, दांडेकर पूल येथे मागासवर्गीयांची मोठया प्रमाणात झोपडपट्टी वसाहत असून ओढ्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली या रहिवाशांची घरे पाडण्याच्या पुणे महापालिकेच्या बेकायदेशीर कृतीची स्वतंत्र चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ( Ambil Odha Anti Encroachment Drive Update )

वाचा:‘ही’ महत्वाची पदे तातडीने भरा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

आंबिल ओढा वस्तीतील घरे पुणे मनपाने तोडल्याचे कळताच डॉ. राऊत यांनी २९ जून रोजी पुणे शहरास भेट दिली होती. पुणे मनपाच्या या कृतीबद्दल डॉ. राऊत यांनी पुणे भेटीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ही कारवाई करणाऱ्यांना लाज वाटायला हवी अशी टीकाही त्यांनी केली होती. ही कारवाई होताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. या प्रकरणात पुणे मनपाने बेकायदेशीर कारवाई केली का? या कारवाईमागे कुणाला बेकायदेशीर लाभ पुरवण्याचा हेतु होता का? पुणे मनपाची या कारवाईसाठी संमती योग्य होती का? याची चौकशी राज्य सरकारकडून होणे आवश्यक आहे. याशिवाय या वस्तीत राबविण्यात येणाऱ्या एस.आर.ए. प्रकल्पाची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. रहिवाशांची खोटी नावे टाकून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे दाखवून या एस.आर.ए. योजनेला बिल्डरने संमती मिळविल्याची तक्रार येथील रहिवाशांनी माझ्याशी बोलताना केली. या तक्रारींची चौकशी होणे गरजेचे आहे. ही कारवाई करताना महिलांशी गैरवर्तन करण्यात आल्याची माहिती मला यावेळी देण्यात आली. या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई केली जाणे गरजेचे आहे, अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

वाचा: फडणवीस तूर्त महाराष्ट्राच्या राजकारणातच; नव्या घडामोडींमुळं शिक्कामोर्तब

सुमारे ७० वर्षांपासून येथे हजारो कुटुंब वास्तव्यास आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन गृहरचना संस्था येथील रहिवाशांनी स्थापन केली आहे. २४ जून रोजी सकाळी ५.३० वाजता मनपा प्रशासनाने घरे खाली करताना वस्तीतील आबालवृद्ध, महिला व मुलींना मारहाण केली. काही घरे, सार्वजनिक शौचालये बेकायदेशीरपणे तोडली, याकडेही त्यांनी पत्रात लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात घरे तोडू नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना आणि करोनाची साथ सुरू असताना बिल्डरला पुढे करून घरे तोडण्याची पुणे मनपाची कृती ही पूर्णत: बेकायदेशीर होती, असे मत डॉ. राऊत यांनी आपल्या पत्रात व्यक्त केले आहे!

वाचा: नारायण राणेंच्या केंद्रातील मंत्रिपदामुळे शिवसेनेला धोका? विनायक राऊत म्हणतात…

एसआरए प्रकल्प राबविणाऱ्या मनपाने या वस्तीला लागून असलेल्या आंबिल ओढा या ४०० वर्षे जुन्या जलप्रवाहाचा मार्ग बदलण्याचा घाट घातला आहे, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. आंबिल ओढ्याचे बांधकाम हे राजमाता जिजाऊ यांनी पुणेकरांना शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी केले होते. सदर आंबिल ओढा सरळ केला तर याचे दुष्परिणाम सर्वे नंबर दांडेकर पूल झोपडपट्टी, ९९९ दत्तवाडी झोपडपट्टी व त्याला लागून असलेले हनुमान नगर झोपडपट्टी, फाळके प्लॉट, १००४ राजेंद्र नगर झोपडपट्टी, १००५ विवेकश्री सोसायटी, इतर बाजूच्या सोसायटी आणि रहिवासी यांना पुराचा धोका जाणवू शकतो. पाण्याचा जोराचा प्रवाह खालील भागात आल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे हा ओढा सरळ करण्यासाठी घरे तोडण्याची पुणे मनपा व मनपातील सत्ताधारी भाजपची कृती चुकीची आहे, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. आपल्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार शिवकालीन वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे असताना राजमाता जिजाऊंनी बांधलेल्या या ओढ्याचा प्रवाह वळवणे ही कृतीच मूळात बेकायदेशीर आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. सदर झोपडीधारकांना मनपाने घराऐवजी घर, दुकानाऐवजी दुकान दयावे. तसेच भरपाई म्हणून एकाच घरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त कुटुंबे वास्तव्यास असल्यास प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र घर देण्यात यावे”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

वाचा: आदित्य ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; नीतेश राणेंनी शब्द मागे घेतले

Source link

- Advertisement -