हायलाइट्स:
- महिला वन कर्मचाऱ्याचा कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा.
- परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयातील धक्कादायक प्रकार.
- अटकाव करणाऱ्या महिला पोलिसावर उगारला हात.
वाचा: रेमडेसिवीरप्रकरणी विखेंच्या अडचणी वाढल्या; पोलीस चौकशीचा कोर्टाचा आदेश
परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखा विभागातील ही महिला कार्यरत आहे. ही बुधवारी दारू पिऊन कार्यालयात धिंगाणा घालू लागल्याने इतर कर्मचारी अवाक् झाले. तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता दारूच्या नशेत धुंद असलेली ही महिला कुणाचंच ऐकायला तयार नव्हती. शेवटी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर काही वेळातच महिला पोलिसांसह पथक कार्यालयात दाखल झालं. या महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न महिला पोलिसांनी केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली. पोलिसांच्या वाहनात तिला बसवले असता दरवाजा उघडून ती परत बाहेर आली. तिथे महिला पोलिसांना तिने शिवीगाळ केली. तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता एका महिला पोलिसावर तिने थप्पड मारली. त्यानंतर पोलिसांनी तिला चांगलाच हिसका दाखवला. याप्रकरणी सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.
वाचा: रोहित्राला लागली आग; स्फोटाच्या भीतीने नागरिकांमध्ये घबराट
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर वनविभागात सेवेत असलेल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण मिळावे, वरिष्ठांकडून त्यांचा छळ होऊ नये यासाठी शासनस्तरावर अनेक पावले उचलली जात आहेत. अशावेळी परतवाडा वनपरिक्षेत्रात चक्क महिला कर्मचाऱ्यानेच दारू पिऊन धिंगाणा घातल्याने सगळेच हादरले आहेत. या प्रकाराने एक वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.
वाचा: ‘सर्वोच्च’ कौतुक: मुख्यमंत्री ठाकरे यांनी लढवय्या मुंबईकरांना दिलं सारं श्रेय