हायलाइट्स:
- जळगाव जिल्ह्याचा रिकव्हरी दर पोहचला ९० टक्क्यांवर
- करोनाची दुसरी लाटत ओसरत असल्याचे मिळाले संकेत.
- आतापर्यंत १ लाख १२ हजार ३५६ रुग्णांनी करोनावर मात.
वाचा: ‘त्या’ विकासाने तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही!; मुख्यमंत्र्यांचा टोला
करोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान व इतर उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांच्यावर पोहचले होते. मात्र जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर १० फेब्रुवारीपासून हे प्रमाण कमी झाले होते. तर ३१ मार्च रोजी हे प्रमाण ८४.९२ टक्क्यांपर्यत खाली आले होते. परंतु, त्यानंतरच्या काळातही जिल्हा प्रशासनाने करोनाची साखळी खंडित करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेंतर्गत करोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन करोना चाचण्या वाढविल्या होत्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. शिवाय मृत्युदर कमी करण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.
वाचा: बाळासाहेब थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; पत्रकारांसाठी केली ‘ही’ विनंती
जिल्ह्यात आजपर्यंत ९ लाख ४८ हजार ७०८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी करोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख २४ हजार ६४६ अहवाल पॉझिटिव्ह तर ८ लाख २२ हजार ९९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या अवघे २०८ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही कमी होत आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ६ हजार ६१९ व्यक्ती होम क्वारंटाइन असून ५८८ व्यक्ती विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १० हजार ५५ रुग्णांपैकी ७ हजार ४३२ रुग्ण लक्षणे नसलेले तर २ हजार ६२३ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी १ हजार ३३८ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असून ७६३ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
वाचा: आधारकार्ड नसलेल्यांचं लसीकरण होणार का?; मुंबईच्या महापौर म्हणतात…