India vs West Indies : तिसऱ्या सामन्यात दीपक चहरने रचला इतिहास

- Advertisement -

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. पण या सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चहरने इतिहास रचला आहे. दीपकने या सामन्यात वेस्ट इंडिजला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. या तीन विकेट्सच्या जोरावर दीपकने मोठा पराक्रम केला आहे.

दीपकने आपल्या तीन षटकांच्या पहिल्या स्पेलमध्ये सुनील नरिन, इव्हिन लुईस आणि शिमरॉन हेटमायर यांना बाद केले. या तीन फलंदाजांना बाद करताना दीपकने फक्त चार धावा दिल्या. या दमदार कामगिरीमुळे दीपकला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. दीपकने चार धावांत तीन विकेट्स मिळवत भारताकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. यापूर्वी हा विक्रम फिरकीपटू कुलदीप यादवच्या नावावर होता. यादवने कोलकाता येथे झालेल्या सामन्यात १३ धावांत वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांना बाद केले होते.

तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने मैदान मारले. विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करून संघाचा विजय पक्का केला. पंतने या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असलेला महत्त्वाचा विक्रम मोडलाच, परंतु धोनीच्या एक पाऊल पुढे टाकले आहे. 

147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( 3) लगेच माघारी परतला. लोकेश राहुलही 20 धावा करून बाद झाला. पण, कोहली आणि पंत यांनी संघाचा विजय पक्का केला. कोहलीनं 45 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या, तर पंतने 42 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 65 धावांची खेळी केली. पंतने या खेळीसह धोनीचा विक्रम मोडला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा धोनीचा विक्रम काल मोडला गेला. धोनीनं 2017मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध 56 धावांची खेळी केली होती. भारतीय यष्टिरक्षकाची ती सर्वोत्तम खेळी होती. पण, पंतने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 65 धावा करून हा विक्रम मोडला. 

- Advertisement -