हायलाइट्स:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रवीण दरेकर यांना फोन.
- लोकलबाबत दरेकर यांच्या पत्राची घेतली दखल.
- सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत दिले आश्वासन.
वाचा: ‘लोकलप्रवासाची परवानगी देत नसाल तर दरमहा ₹ ५ हजार प्रवास भत्ता द्या’
मुंबई उपनगरीय लोकल रेल्वेतून सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. इतर प्रवाशांना लोकलची दारे बंद करण्यात आली आहेत. यामुळे दूरच्या उपनगरांतून दररोज कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची सगळ्याच बाबतीत ओढाताण होत आहे. याकडे एका पत्राद्वारे प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले होते. लोकल सर्वांसाठी खुली करण्यात यावी. त्यातही ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी तातडीने ही परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच दखल घेतली आहे.
वाचा: ‘दाढीवाला चोर कोण ते आशिष शेलार यांनी सांगायला हवे’
मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांना फोन करून याबाबत दरेकर यांचे म्हणणे जाणून घेतले. उपनगरीय लोकलचे जाळे खूप मोठे आहे. कसारा, कर्जत, खोपोली, डहाणू, पनवेलपर्यंत लोकल धावते. याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी दरेकर यांच्याशी तपशीलवार चर्चा केली. याबाबत दरेकर यांनीच माध्यमांना माहिती दिली असून लोकल सर्वांसाठी खुली करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, असे दरेकर यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत त्यादृष्टीने निर्णय अपेक्षित असल्याचेही दरेकर यांनी नमूद केले.
दरेकर यांनी आज पत्र पाठवले आणि…
कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या चाकरमान्यांना लोकल प्रवासाची अनुमती मिळावी यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना दरेकर यांनी आज पत्र पाठवले होते. मुंबईचा करोना पॉझिटीव्हिटी दर कमी आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी तातडीने लोकल सुरू करावी. कल्याण-डोंबिवलीहून खासगी वाहनाने मुंबईत येण्यासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतात, त्यामुळे चाकरमान्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घ्यावा, अशी विनंती दरेकर यांनी पत्रात केली होती. या प्रश्नाची तड न लागल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दरेकर यांनी दिला होता. या पत्रानंतर काही तासांतच मुख्यमंत्र्यांनी दरेकर यांना फोन केला.
वाचा: जेसीबीने गुलाल उधळणं पडलं महागात; ‘त्या’ १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल