OBC reservation दोन राजे एकत्र आले याचा आनंद, मात्र त्यांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावेत: विजय वडेट्टीवार

OBC reservation दोन राजे एकत्र आले याचा आनंद, मात्र त्यांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावेत: विजय वडेट्टीवार
- Advertisement -

हायलाइट्स:

  • आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच- विजय वडेट्टीवार.
  • मात्र या दोन्ही राजेंनी ओबीसींच्या आरक्षणासाठीही प्रयत्न करावेत- विजय वडेट्टीवार
  • राजे हे सर्व समाजाचे असतात- विजय वडेट्टीवार

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट झाल्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे, मात्र या दोन्ही राजेंनी ओबीसींच्या आरक्षणासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री वडेट्टीवार यांनी दोन्ही राजेंना केले आहे. (Vijay Wadettiwar says Sambhaji Raje and Udayan Raje should also work for OBC reservation)

मराठा आरक्षणासाठी दोन राजे एकत्र येत असतील तर त्याचा आनंद आहेच. कोणत्याही समाजाला न्याय हा मिळालाच पाहिजे. मात्र राजेंनी ओबीसी समाजासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत. राजे हे सर्व समाजाचे असतात, असे सांगतानाच दोन्ही राजे ओबीसी समाजासाठी देखील प्रयत्न करतील अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

आज पुण्यातील औंध परिसरात खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांची भेट झाली. या दोन राजेंदरम्यान सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. भेटीदरम्यान खासदार उदयनराजे यांनी संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.

क्लिक करा आणि वाचा- मराठा समाजासाठी ‘सुपर न्यूमररी’चा वापर करावा; खासदार संभाजीराजेंची सरकारला सूचना

दरम्यान, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण प्रश्नासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार प्रयत्नशील आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी येत्या २६ आणि २७ जून असे दोन दिवस ओबीसी नेत्यांचे लोणावळा येथे शिबीर होत आहे. या शिबिराला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ओबीसी नेते म्हणून हजेरी लावणार आहेत. या शिबिराचा कोणीही राजकीय फायदा उचलू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षण: समाजाचा उद्रेक झाल्यास जबाबदार कोण?; उदयनराजेंचा सवाल

‘मुंबई लोकलबाबत अद्याप निर्णय नाही’

वडेट्टीवार मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनलॉकिंग आणि मुंबईच्या लोकलबाबतही माहिती दिली. आपण राज्यात वेगवेगळ्या स्तरावर अनलॉक करत आहोत. मात्र करोना अजूनही गेलेला नसून मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्ङणाले. तसेच मुंबईत लोकल सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. मुंबई सध्या तिसऱ्या लेव्हलवर असून जर शहरातील परिस्थिती सुधारली तरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही ते पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसेनेची विचारधारा चंचल झाली आहे’; दरेकर यांनी साधला निशाणा

Source link

- Advertisement -