पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सांधेदुखी आणि तापामुळे दाखल केलेल्या रुग्णाचा रक्त तपासणीचा दुसरा अहवाल न बघताच चुकीच्या पद्धतीने डायलिसिसचे उपचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात तपासणी केल्यावर दोन्ही किडन्या उत्तम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबतची माहिती राजेश आडसूळ यांनी दिली. ते म्हणाले, ‘चिंचवड येथे राहणारा आनंद अनिवाल या रुग्णाला सांधेदुखी आणि तापामुळे वायसीएमएच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विविध तपासण्या केल्यावर त्यात क्रिटेनीनचे प्रमाण 24 असल्याचे दाखविले. सामान्य माणसाच्या शरीरात 0.66 ते 1.25 इतके त्याचे प्रमाण असते.
हे प्रमाण जास्त असल्याचे किडनी निकामी असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तात्काळ उपचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तोपर्यंत त्याचे रक्त पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठविले होते. परंतु, तपासणीचा अहवाल न पाहताच तरुणावर ‘डायलिसिस’चे उपचार केले. नातेवाईकांना शंका आल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात तपासणी केल्यावर दोन्ही किडन्या उत्तम असल्याचे दिसून आले. मुलावर चुकीच्या पद्धतीने उपचार करणा-या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.