आधुनिक फीड तंत्रज्ञानातून मत्स्यपालनाला नवी दिशा – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ९ :  मत्स्यव्यवसाय व ॲक्वाकल्चर क्षेत्राची उत्पादकता, कार्यक्षमता, शाश्वतता आणि नफा वाढविण्यासाठी आधुनिक पोषण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील सागरी व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व कार्यपद्धतींच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान त्यांनी येथील नेक्सजेन फीड्स या अत्याधुनिक उत्पादन व अॅक्वाकल्चर सोल्युशन्स केंद्राला भेट दिली.

    भारतातील प्रमुख ॲक्वाकल्चर फीड उत्पादक कंपनी असलेल्या दीपक नेक्सजेनच्या या केंद्रात मंत्रीराणे यांनी आधुनिक मत्स्य व कोळंबी पोषणामागील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. कच्च्या मालाच्या प्रक्रियेपासून फीड निर्मिती व फॉर्म्युलेशन, गुणवत्ता तपासणी तसेच मत्स्यपालनासाठी विकसित करण्यात आलेल्या विशेष उत्पादनांपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची पाहणी यावेळी करण्यात आली.

    नेक्सजेनच्या किंगफिश आणि आयफीड या ब्रँडअंतर्गत उपलब्ध उत्पादनांसह व्हॅनामी कोळंबीसाठीचे विशेष फीड, फंक्शनल न्यूट्रिशन, प्रोबायोटिक्स, मिनरल्स, फीड ॲडिटिव्ह्ज तसेच मत्स्यपालनातील आरोग्यविषयक विविध उपाययोजनांची माहिती मंत्री राणे यांनी घेतली. मत्स्य व कोळंबीची निरोगी वाढ, फीडचा कार्यक्षम वापर, सातत्यपूर्ण पोषण आणि जलगुणवत्ता सुधारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही त्यांनी अभ्यास केला.

    फीड उत्पादनापासून थेट मत्स्यपालनाच्या शेतापर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी समजून घेण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले. वैज्ञानिक पोषण, आधुनिक तंत्रज्ञान आणि मत्स्य शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांमधील उपयुक्त बाबींचा महाराष्ट्रात प्रभावीपणे उपयोग करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

    000

    मनिषा सावळे/विसंअ

    - Advertisement -