
मुंबई, दि. १५: २०२५-२६ या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री सरनाईम बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी वापर आणि जबाबदारी निश्चिती या तत्वांवर भर देत लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण उत्पन्न ११,४७५ कोटी रुपये तर खर्च १२,०६६ कोटी रुपये झाला. दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये. खर्च ३३ कोटी रुपये झाला.
मागील आर्थिक वर्षात जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे विभाग नफ्यात होते. उर्वरित २३ विभागांनी कामगिरी सुधारण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.
“येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करणे अत्यावश्यक आहे. दैनंदिन तोटा भरून काढणे हे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे,” असे ते म्हणाले.
नफ्यात नसलेल्या विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणांची मिमांसा करावी व त्यावर ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
नागपूर विभागातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.
0000





















WhatsApp