ओ. पी. नय्यर जन्मशताब्दीनिमित्त ७ जून रोजी विशेष संगीत रजनी

ओ. पी. नय्यर जन्मशताब्दीनिमित्त ७ जून रोजी विशेष संगीत रजनी
- Advertisement -


मुंबई, दि. ४: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘तुमसा नहीं देखा’ या विशेष संगीत रजनी कार्यक्रमाचे 7 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम रविवार 7 जून रोजी रात्री 8.30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका 6 जून 2026 पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील. भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताच्या सुवर्णयुगाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि लयबद्ध संगीतशैलीने समृद्ध करणारे संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या संगीताने हिंदी चित्रपटसंगीताला एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली. ‘उडे जब जब जुल्फें तेरी’, ‘आईये मेहरबान’, ‘ये है बॉम्बे मेरी जान’, ‘दीवाना हुआ बादल’, ‘जाइये आप कहाँ जायेंगे’ यासारखी अनेक अजरामर गीते आजही रसिकांच्या मनात लोकप्रिय आहेत. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष संगीत रजनीत त्यांच्या निवडक आणि गाजलेल्या गीतांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात येणार आहे.

गायक जय आजगांवकर, धनश्री देशपांडे, अर्चना गोरे आणि श्रीकांत नारायण हे कलाकार ओ. पी. नय्यर यांच्या बहारदार गीतांचे सादरीकरण करणार आहेत.

ओ. पी. नय्यर यांच्या संगीताची वैशिष्ट्यपूर्ण शैली, त्यांच्या सुरावटींमधील चैतन्य; तसेच हिंदी चित्रपटसंगीताला त्यांनी दिलेले बहुमोल योगदान या कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडले जाणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास संगीतप्रेमी व रसिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ



Source link

- Advertisement -