महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी देण्यात येणार असून लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्याची अपेक्षा आहे.
शेती व्यवसाय हा नैसर्गिक आपत्ती, हवामानातील अनिश्चितता, बाजारभावातील चढ-उतार आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे अनेकदा जोखमीचा ठरतो. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करणे अनेक शेतकऱ्यांसाठी कठीण बनते. कर्जमुक्ती योजना अशा शेतकऱ्यांना नव्याने उभारी देण्याचे काम करणार आहे.
कर्जमाफीचे प्रमुख फायदे
१. आर्थिक दिलासा
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी होईल. त्यामुळे त्यांना मानसिक आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल.
२. नव्याने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा
अनेक शेतकरी थकीत कर्जामुळे नवीन कर्ज घेण्यास अपात्र ठरतात. कर्जमाफीमुळे त्यांचा कर्जाचा इतिहास सुधारेल आणि पुढील हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज मिळविणे सुलभ होईल.
३. शेतीमध्ये गुंतवणूक वाढण्यास मदत
कर्जमुक्त झालेला शेतकरी सुधारित बियाणे, सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अधिक सक्षम होतो. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
४. मानसिक तणावात घट
कर्जाच्या चिंतेमुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली असतात. कर्जमाफीमुळे त्यांना दिलासा मिळून सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
५. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
शेतकऱ्यांच्या हातात पैसा उपलब्ध झाल्यास स्थानिक बाजारपेठ, कृषी सेवा, व्यापारी आणि ग्रामीण उद्योगांना देखील त्याचा लाभ मिळू शकतो.
६. नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही प्रोत्साहन
या योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या योजनेमुळे सुमारे ५५ ते ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीक कर्जाची माफी, एकवेळ समझोता (OTS) आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ असे तीन महत्त्वाचे घटक या योजनेत समाविष्ट आहेत.
निष्कर्ष
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमाफी नसून शेतकऱ्यांना नव्याने उभारी देणारी संधी आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत शेती क्षेत्राला बळकटी देण्याचा हा प्रयत्न आहे. योग्य अंमलबजावणी आणि पारदर्शक प्रक्रिया यामुळे ही योजना राज्यातील कृषी विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. कर्जमुक्त शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेतीत गुंतवणूक करून उत्पादनवाढीस हातभार लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
०००००
हेमंतकुमार चव्हाण
माहिती अधिकारी, सातारा





















WhatsApp