औषधनिर्माण अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करावी – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २५ : सार्वजनिक आरोग्य विभागातील औषधनिर्माण अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, या मागण्यांवर आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

    राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल भवन येथे औषधनिर्माण अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव डॉ. उर्मिला जोशी, सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, शासकीय औषधनिर्माता गट-क कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजित गायकवाड, सरचिटणीस गुणवंत भारूळे आदी उपस्थित होते.

    राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, औषधनिर्माण अधिकारी संवर्गाला पदोन्नतीची साखळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा. तसेच वरिष्ठ औषधनिर्माण अधिकारी या पदाच्या सेवाप्रवेश नियमांबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावा. तसेच ग्रामीण रुग्णालयांमधील औषधसाठा व्यवस्थापन आणि औषध वितरण कक्ष अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या कक्षांची आधुनिक पद्धतीने उभारणी व बळकटीकरण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    रुग्णालयांमधील कालबाह्य अथवा वापरास अयोग्य औषधांच्या निर्लेखनाबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करून त्यासंदर्भातील आवश्यक आदेश निर्गमित करावेत. याचबरोबर औषधनिर्माण अधिकारी संवर्गाच्या प्रशासकीय व सेवाविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यासोबतच रुग्णालयांमधील औषधसाठा व्यवस्थापन आणि वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम, आधुनिक व सुसज्ज करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असेही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

    ०००००

    गजानन पाटील/विसंअ

    - Advertisement -