रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास अनुभवातून समृद्ध झाला- अभिराम भडकमकर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २५ : रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि साहित्य क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव, लेखनप्रक्रिया आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा कलाक्षेत्रावर होणारा परिणाम याविषयी ज्येष्ठ नाटककार, पटकथालेखक, कादंबरीकार, अभिनेते व दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

    मुंबई बुक फेस्टिवल २०२६ च्या ‘फ्रॉम स्टेज टू स्क्रीन’ या विषयावरील संवादात त्यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) शिक्षण घेत असतानाचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले. यावेळी अमेय रानडे यांनी त्यांची मुलाखत घेतली.

    भडकमकर यांनी ‘बालगंधर्व’ आणि ‘पछाडलेला’ यांसारख्या चित्रपटांच्या पटकथा व संवाद लेखनाच्या अनुभवांवरही प्रकाश टाकला. भारतीय संस्कृती आणि देशाच्या वैचारिक जडणघडणीविषयी बोलताना रामायण, महाभारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान या आधारांवर भारत उभा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पुस्तके अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, वाचनसंस्कृती वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

    कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि विज्ञानाच्या वापराबाबत बोलताना विज्ञानाचा उपयोग मदतीसाठी केला तर ते वरदान ठरते; मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या आहारी गेल्यास ते शाप ठरू शकते, असे भडकमकर यांनी सांगितले. पूर्वी दूरध्वनीच्या काळात अनेकांचे फोन क्रमांक पाठ असायचे; मात्र आता मोबाईलमुळे मोजकेच क्रमांक लक्षात राहतात, असे उदाहरण त्यांनी दिले. तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा; मात्र त्याच्या आहारी जाता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    ०००००

    - Advertisement -