राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक –राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २५ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

    निर्मल भवन येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांचे समायोजन, मानधनवाढ, विमा संरक्षण, विशेष भत्ते तसेच रुग्णवाहिका सेवेतील कंत्राटी वाहनचालकांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार कार्यक्रम सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि लेखापाल या पदांवर समायोजन करण्याच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याच्या मागणीवरही विचारविनिमय करण्यात आला.

    अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवास भत्ता लागू करण्याबाबत चर्चा झाली. तसेच नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांप्रमाणे आवश्यक विशेष भत्ते आणि इतर सुविधा लागू करण्याच्या मागणीचाही आढावा घेण्यात आला.

    याशिवाय, २४४७ रुग्णवाहिका सेवेत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांना शासकीय विभागातील वाहनचालकांच्या रिक्त पदांवर विनाअट समायोजित करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून योग्य तोडगा काढण्याच्या अनुषंगाने या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

    या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव डॉ. उर्मिला जोशी, सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुधांश रानडे तसेच संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

    ०००००

    गजानन पाटील/विसंअ

     

    - Advertisement -