
२४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे आयोजन
मुंबई दि २४ : पुस्तकांना, ग्रंथांना भौगोलिक सीमा कधीच नसतात. भारतीय परंपरेत ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण असून पुस्तके आणि ग्रंथांमध्ये समाज घडविण्याची अभूतपूर्व ताकद असते. समृद्ध, प्रगल्भ समाज घडविण्यात ग्रंथांचे मोलाचे योगदान आहे. मुंबई पुस्तक महोत्सव संवेदनांचा आणि मानवतेचा महोत्सव ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष दालनाला तसेच पुस्तकांच्या दालनाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सात पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, मुख्य आयोजक आमदार अमित साटम, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार पराग अळवणी, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी संस्कृती, अस्मिता आणि भाषा मुंबईने जपली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याबरोबरच मनोरंजन आणि फिनटेक ही देखील मुंबईची ओळख आहे. मुंबईत कला, साहित्य आणि संस्कृतीला नेहमीच पोषक वातावरण मिळाले. अनेक नामवंत साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि विचारवंत मुंबईने देशाला दिले.
मराठी संस्कृती, अस्मिता आणि भाषा मुंबईने जपली. मुंबईची संस्कृती त्यामुळेच अनोखी आहे. अनेक साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था मुंबईत सुरू झाल्या या संस्थांनीच मुंबईला घडविले. अनेक विचारवंतांनी मुंबईची संस्कृती समृद्ध केली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘दर्पण’सारखे नियतकालिक मुंबईतच सुरू झाले, यातूनच ज्ञानाचे नवे दालन उघडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपली विविध नियतकालिके मुंबईतूनच सुरू केली आणि वंचितांचा आवाज बुलंद केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य दूर रशियात पोहोचले. हे केवळ पुस्तकांच्या, ग्रंथांच्या चळवळीतूनच शक्य झाले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

‘एआय’च्या जगातही ज्ञानाचे, ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्याकडील नालंदा विद्यापीठातील ग्रंथसंपदा अतिशय विपुल होती. सर्व विषयातील ज्ञान भंडार या ग्रंथसंपदेत समाविष्ट होते. आज आपण ज्ञानाधिष्ठित अर्थ व्यवस्थेकडे वाटचाल करीत आहोत. ‘एआय’च्या जगातही ज्ञानाचे, ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तंत्रज्ञानाला मूल्य संवेदना समजू शकत नाही त्यासाठी मानवी संवेदनाच हव्यात. ग्रंथसंपदेच्या संपन्न वारशामुळेच आपण रोबो झालो नाहीत. ‘ज्ञान भारतम्’च्या माध्यमातून आपली प्राचीन हस्तलिखिते जतन करण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे.
‘मुंबई पुस्तक महोत्सव’ अनेक विक्रम नक्कीच मोडीत काढेल
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुस्तक, ग्रंथ हे आपले खरे मित्र असतात ते आपले व्यक्तिमत्व घडवतात. संवेदना जागृत ठेवतात. मुंबईत होत असलेला मुंबई पुस्तक महोत्सव मुंबईकरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. आता हा पुस्तक महोत्सव मुंबईत दरवर्षी आयोजित होणार आणि मुंबईच्या संस्कृतीचा अविभाज्य भागच होणार आहे. मुंबई पुस्तक महोत्सवाला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता वाचन संस्कृती नक्कीच टिकणार याबाबत विश्वास वाटतो. मुंबई पुस्तक महोत्सव अनेक विक्रम नक्कीच मोडीत काढेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे म्हणाले, भारतीय परंपरेत ज्ञानसाधनेला मोठे महत्त्व आहे. विकसित भारताची आधारशीला प्रगल्भ वाचक ठरू शकतो. मुंबई पुस्तक महोत्सव मुंबईकरांसाठी निश्चितच सांस्कृतिक पर्वणी ठरणार असल्याचे प्रा. मराठे यांनी सांगितले.
मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले, आपली अर्थव्यवस्था ही ज्ञानाधिष्ठित असून मुंबई पुस्तक महोत्सवासारखे आयोजन या संकल्पनेला अधिकच बळकट करणारे ठरते. अनेक वैशिष्ट्यांमुळे मुंबई पुस्तक महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.
मुख्य आयोजक आमदार अमित साटम म्हणाले, समृद्ध ज्ञानपरंपरेचा वारसा आपल्याला लाभला आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा मुंबई पुस्तक महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी आभार मानले.
• साहित्य, कला आणि संस्कृतीचा भव्य उत्सव
• ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक साहित्यिक सत्रे
• बालकांसाठी विशेष उपक्रम
• मराठी लेखक मंचावर ५० सत्रांचे आयोजन

वाचनसंस्कृतीचा प्रसार, साहित्यिक विचारांची देवाणघेवाण आणि नव्या पिढीला पुस्तकविश्वाशी जोडण्याच्या उद्देशाने २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या महोत्सवात साहित्य, शिक्षण, कला आणि संस्कृती क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत.
या महोत्सवात ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक साहित्यिक सत्रे, बालकांसाठीचे २० हून अधिक उपक्रम आणि ९५ हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील गेट क्रमांक २ येथे हा महोत्सव होत आहे.
लेखक मंचावर साहित्यिकांची मांदियाळी
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘लेखक मंच–१’. या मंचावर विविध विषयांवरील साहित्यिक चर्चा, विचारमंथन आणि लेखकांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. मराठी साहित्य, समकालीन लेखन, नाटक, इतिहास, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण आणि सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांचा या सत्रांमध्ये समावेश आहे. नामवंत लेखक, साहित्यिक आणि विचारवंत या चर्चांमध्ये सहभागी होणार आहेत.
मराठी लेखक मंचावर ५० सत्रे
मराठी साहित्यप्रेमींसाठी ‘लेखक मंच–२ (मराठी मंच)’ हे विशेष व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या मंचावर एकूण ५० सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती आणि समकालीन सामाजिक विषयांवर या मंचाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे.
बालकांसाठी विशेष उपक्रम
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान विविध बालउपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. कथाकथन, चित्रकला, लेखन, वाचन, प्रश्नमंजुषा आणि विविध सर्जनशील स्पर्धांचा यात समावेश आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
साहित्यिक चर्चांसोबतच महोत्सवात संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त विशेष प्रदर्शन, महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त विशेष प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.

वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ
डिजिटल युगात वाचनाची आवड वाढविणे, नव्या पिढीला पुस्तकांकडे आकर्षित करणे आणि लेखक-वाचक यांच्यात संवादाचे व्यासपीठ निर्माण करणे या दृष्टीने मुंबई पुस्तक महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक चर्चा, लेखकांशी संवाद, बालकांसाठी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साहित्याचा व्यापक प्रसार करण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जाणार आहे.
महोत्सव दृष्टीक्षेपात
– मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६
– कालावधी : २४ ते २९ नोव्हेंबर २०२६
– आयोजक : नॅशनल बुक ट्रस्ट (NBT), भारत सरकार, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ, बृहन्मुंबई महानगरपालिका
– सहभाग व सहकार्य : महाराष्ट्र शासन
– स्थळ : मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, गेट क्रमांक २, मुंबई
– पुस्तकांचे स्टॉल : ६०० हून अधिक
– साहित्यिक सत्रे : २०० हून अधिक
– बालकांसाठी उपक्रम : २० हून अधिक
– सांस्कृतिक कार्यक्रम : ९५ हून अधिक
– मराठी लेखक मंच : ५० सत्रे
– संपर्क क्रमांक : ९८२ ०७ ०० ८८८
https://mumbaibookfestival.com/
या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
साहित्य, ज्ञान, विचार आणि संस्कृती यांचा संगम घडविणारा मुंबई पुस्तक महोत्सव हा मुंबईकरांसह राज्यभरातील पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, लेखक आणि साहित्यरसिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे.
०००००

WhatsApp