
छत्रपती संभाजीनगर, दि. 9 (जिमाका) – शेतात शेतकरी बी पेरतो तेव्हा तो स्वप्ने पेरत असतो. भूमि आणि पाऊस हे त्या स्वप्नांना आकार देत असतात. मात्र भेगाळली भूमि आणि दूरावलेला पाऊस ही पिके आणि शेतकऱ्याची स्वप्नेही करपून टाकतो. दुष्काळाची हीच दाहकता आज केंद्रीय पथकाने अनुभवली.
निसर्गाचा कोप म्हणावा तो हाच. राज्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कालपासून राज्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आले आहे. कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा या पथकात समावेश आहे. आजच्या पाहणीत राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड तसेच अन्य अधिकारीही सहभागी होते.
खरेतर प्रशासनाने सादर केलेल्या तक्ते आणि आकडेवारीत बंद दाराआड दुष्काळ कळतो. बैठकांचे सोपस्कारही पार पाडता आले असते. मात्र दुष्काळाची भीषणता दिसते ते शेतकऱ्याच्या करपलेल्या स्वप्नात, आसवं सुकलेल्या डोळ्यांत. ज्या पिकाच्या भरवशावर शेतकऱ्याच्या डोळ्यात वर्षभराची स्वप्ने असतात. संसाराची गणिते असतात. तिच पिके पावसाअभावी जळून जातात तेव्हा त्या हिरव्या स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी झालेली दिसते.
देमनी येथील शेतकरी विलास शिंदे यांनी केली होती मशागत, लागवडीची मेहनत, बियाणे, खते, मजूरी यासाठी खर्च मात्र पावसाने पाठ फिरवली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. ही दाहकता आज केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन अनुभवली.
केंद्रीय पथकाने आज सकाळी देमनी शिवारात भेट देऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केली. कागदावरील तक्त्यांमध्ये दिसणाऱ्या आकडेवारीपलीकडे जाऊन शेतातील वास्तव जाणून घेतले. याठिकाणी जमलेल्या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि त्यांच्या अडचणींची माहिती घेतली. आपुलकीने झालेला हा पाहणी दौरा केवळ प्रशासकीय सोपस्कार न ठरता, शेतकऱ्यांना धीर दिलासा देणारा ठरला.
झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे, मदतीचे नियोजन, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून महसूलमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी सगळ्यांनी वेळोवेळी भेट देऊन शेतकऱ्याला दिलेला धीर. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकणे, प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेणे, हा मदतीच्या दिशेने टाकलेला महत्त्वाचा टप्पा आहे. ‘शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी’, हे केवळ एक वाक्य न राहता ते प्रत्यक्षात येणारी अनुभूती आहे, याचाच प्रत्यय यानिमित्ताने आला.
०००००

WhatsApp