नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका): बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. तसेच जिल्ह्यात बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही यासाठी आवश्यक नियोजन करावे आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वाढवावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. हसन मुश्रीफ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी व जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार राजेश पाडवी, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, जिल्हा कृषि अधिकारी किशोर हडपे यावेळी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, सध्या हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत काही भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र या पावसाचा मान्सूनशी संबंध नसल्याने शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणी करू नये. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. तसेच विजांच्या कडकडाटाच्या काळात नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे 2 लाख 97 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. या क्षेत्रासाठी 31 हजार 640 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून आजअखेर 26 हजार 685 क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध आहे. आणखी बियाण्यांचा पुरवठा सुरू असून जिल्ह्यात बियाण्यांची टंचाई भासणार नाही याबाबत निर्देश बैठकीत देण्यात आले.
खतांच्या उपलब्धतेबाबत जिल्ह्यासाठी 1 लाख 7 हजार 800 मेट्रिक टन खतांचे वाटप मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये युरिया, डीएपी व इतर खतांचा समावेश असून आजअखेर 31 हजार 655 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे. तसेच संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत 4 हजार 850 मेट्रिक टन युरिया आणि 340 मेट्रिक टन डीएपीचा संरक्षित साठा राखून ठेवण्यात आला असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर सहा भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांबाबत तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी टोल फ्री व व्हॉट्सॲप क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यावेळी जिल्ह्यातील पोषक तृणधान्यांच्या (मिलेट्स) उत्पादनवाढीवर विशेष भर देण्यात आला. चालू खरीप हंगामात 1 हजार हेक्टर क्षेत्रावर पोषक तृणधान्य पिकांची प्रात्यक्षिके राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, या पिकांच्या मूल्यवर्धनासाठी हैदराबाद येथील भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेच्या (IIMR) सहकार्याने प्राथमिक प्रक्रिया केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ व तालुकास्तरावरील अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ यांनी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना वेळेवर आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
0000000000






















WhatsApp