वडूज, प्रतिनिधी – वडूज येथील अवैध खाजगी सावकारी प्रकरणातील सतीश चव्हाण (रा. वडूज) याला वडूज पोलिसांनी 48 तासांच्या आत जेरबंद केले असून त्याला वडूज पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
किरण लोहारा (रा. पुसेसावळी) यास गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यास 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील दोन जण अद्याप फरार आहेत.
याबाबत माहिती अशी, वडूज येथीर पांडुरंग यादव यांनी खाजगी सावकरांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर खाजगी सावकारांवर वडूज पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यातील सतीश चव्हाण हा फरार झाला होता. वडूज पोलीस ठाण्यातील दोन पथके त्याच्या मागावर होती. चव्हाण हा मुंबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडूज पोलिसांचे पथक रवाना झाले.
बदलापूर ते मुलुंड या दरम्यान सतीश चव्हाणच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, अमोल माने, दीपक देवकर, राहुल सरतापे, शिवाजी खाडे यांनी ही कारवाई केली. या गुन्ह्यातील संजय जाधव (रा. पुसेसावळी) व बाबासाहेब पवार (रा. वडूज) हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, सतीश चव्हाणच्या मालकीची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.