- २ एकर ११ गुंठे शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
मुंबई, दि. २५ : मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर येथील शंकरा कॉलनी परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या २३ व्यावसायिक गाळ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईद्वारे २ एकर ११ गुंठे शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. सदर शासकीय जमीन मौजे चेंबूर, न.भू.क्र.८२३. स.नं.३७६. क्षेत्रफळ २ एकर ११ गुंठे असून, या जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले २३ व्यावसायिक गाळे निष्कासित करण्यात आले.
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणे निष्कासनासाठी मोहिम जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या समन्वयातून मोहिम सुरु केली आहे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. शासकीय जमिनीचे संरक्षण करणे आणि अनधिकृत अतिक्रमणांना आळा घालणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असून, मुंबई उपनगर जिल्हयातील इतर शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यासाठीही अतिक्रमणांविरुध्द पुढील काळातही अशाच प्रकारची तीव्र गतीने विशेष मोहीम राबविण्यात येऊन नियमानुसार कठोर कारवाई सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
सदर कारवाई अपर जिल्हाधिकारी, पूर्व उपनगर, उपजिल्हाधिकारी (अति/निष्का), चेंबूर, उपविभागीय अधिकारी (पूर्व उपनगरे) आणि तहसीलदार, कुर्ला मुलुंड यांच्या समन्वयाने महसूल विभागाच्या पथकाद्वारे करण्यात आली. कारवाईदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवश्यक यंत्रणा तसेच पोलीस विभागाकडून कडेकोट बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला होता.
0000









WhatsApp