मुंबई, दि. ३ : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिल्या.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन व विकास समितीअंतर्गत (डीपीडीसी) सुरू असलेल्या विकास कामांचा तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, कामांची प्रगती आणि निधीच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ अंतर्गत प्रस्तावित तसेच सुरू असलेल्या विविध विकास कामांचा संक्षिप्त आढावा सादर करण्यात आला. संबंधित विभागांनी मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, तसेच विकास कामांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून कामांना गती द्यावी, असे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.
जिल्ह्यातील विकासकामांसाठी उपलब्ध निधीचा प्रभावी आणि नियोजनबद्ध वापर करण्यासोबतच नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. मंजूर विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत आणि निधीचा विनियोग वेळेत होईल, यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
0000






















WhatsApp