शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Advertisement -


नागपूर, दि. २ : शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची गरज नाही, तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’च्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी श्रीरामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल, उपाध्यक्ष एस. राठी, पी. पालडीवाल, महासचिव राजेंद्र पुरोहित, सचिव अॅड. प्रदीप अग्रवाल, कैलाशचंद्र अग्रवाल, कोषाध्यक्ष अशोककुमार पचेरीवाला, विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस.एस. मंथा, कुलगुरू डॉ. आर.एस. पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था म्हणून रामदेवबाबा विद्यापीठाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षणाच्या मूळ उद्देशांशी स्वतःला जोडून ठेवत व्यापारीकरणापासून दूर राहण्याचे कार्य या संस्थेने केले आहे. खाजगी संस्था असूनही देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये तिचा समावेश होतो. आज या संस्थेचे विद्यापीठात रूपांतर झाले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात तसेच शिक्षणाला नवा आकार देणाऱ्या देशातील अत्यंत नामांकित विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचा समावेश होईल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकंडक्टर आणि क्वांटम कॉम्प्युटिंग तंत्रज्ञान हे या शतकाच्या भविष्याला आकार देणारे प्रमुख घटक ठरणार आहेत. औद्योगिक क्रांतीचा विचार केला तर पहिल्या औद्योगिक क्रांतीला १७४० च्या सुमारास, दुसरीला १८६० च्या सुमारास आणि तिसऱ्या क्रांतीला १९५० च्या सुमारास सुरुवात झाली होती. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांमुळे आज २०२६ मध्ये आपण पाचव्या औद्योगिक क्रांतीची चर्चा करीत आहोत. ही क्रांती कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप टेक्नॉलॉजी आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. आता जगाने सहाव्या औद्योगिक क्रांतीची चर्चा देखील सुरू केली आहे, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.

ज्या प्रचंड वेगाने तंत्रज्ञान तसेच व्यवसायाचे स्वरूप बदलत आहे, ते लक्षात घेता आपल्या शैक्षणिक संस्थांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. बराच काळ आपण सीपीयूची चर्चा करीत होतो, आता जीपीयूची चर्चा करीत आहोत. क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे संशोधन प्रक्रियेला अभूतपूर्व गती मिळाली आहे. बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन घडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येत्या एक हजार दिवसांत नोकऱ्यांच्या क्षेत्रातील सुमारे ७० टक्के नोकऱ्यांचे स्वरूप आमूलाग्र बदलणार आहे. नोकऱ्या कमी होणार नाहीत, मात्र त्यांचे स्वरूप निश्चितच बदलेल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हा बदल अटळ आहे. त्यामुळे जग ज्या वेगाने बदलत आहे, त्या वेगाशी सुसंगत राहण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्थांनाही शिक्षणाच्या पद्धतीत बदल करावे लागतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातही व्यापक बदल घडत आहेत. रोगांच्या व्यवस्थापनात आमूलाग्र बदल झाले आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेले कृषी क्षेत्र हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक लाभ होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. अलिकडेच राज्य सरकारने ‘महाविस्तार’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप सुरू केले असून ते पूर्णपणे कृषी क्षेत्राला समर्पित आहे. कोणताही शेतकरी आपल्या भाषेत प्रश्न विचारून पिकांवरील कीड, खतांचे व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही समस्येबाबत माहिती मिळवू शकतो. पिकाचा साधा फोटो अपलोड केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल त्या पिकाची सद्यस्थिती, भविष्यातील संभाव्य समस्या आणि आवश्यक व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती देऊ शकते. या तंत्रज्ञानामुळे शेतीचा उत्पादन खर्च सुमारे २५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो, तर उत्पादकता २५ ते ३० टक्क्यांनी वाढू शकते. हीच कृत्रिम बुद्धिमत्तेची खरी ताकद आहे. आज कोणतेही क्षेत्र एका चौकटीत राहिलेले नाही. अभियांत्रिकी असो, बायोटेक्नॉलॉजी असो किंवा इतर कोणतीही शाखा, आता स्वतंत्रपणे शिक्षण घेऊन चालणार नाही. बहुविषयक दृष्टिकोन स्वीकारणे काळाची गरज बनली आहे. जगाचा इतिहास पाहिला तर मोठ्या नवकल्पना उद्योगक्षेत्रातून नव्हे, तर विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधूनच उदयास आल्या आहेत. आज तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, त्यांची वाटचालही एखाद्या विद्यापीठातून किंवा संशोधन संस्थेतूनच सुरू झाली आहे. त्यामुळे ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि नावीन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. रामदेवबाबा विद्यापीठही या परंपरेला अधिक बळकट करत देशातील संशोधन आणि नवोन्मेषाला नवी दिशा देईल, असा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’चे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना श्रीरामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांनी आपल्या मनोगतात हे केंद्र संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एस. पांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यापीठाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

0000



Source link

- Advertisement -