- जागतिक छायाचित्र दिनी ३५ छायाचित्रकारांचा गौरव
ठाणे,दि. २० (जिमाका) :- जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. या तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा आणि छायाचित्रकारांचा सत्कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान ठामपा मुख्यालयात १५० छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. ठाण्यातील २२ छायाचित्रकार आणि १२ हौशी छायाचित्रकारांचे छायाचित्रांनी ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि विकासाचे चित्र टिपले. अशा या छायाचित्रकारांचा गौरव कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, नौपाडा कोपरी प्रभागाच्या सभापती मीनल संख्ये, नगरसेवक सीताराम राणे, ठाणे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, कै. यशवंतराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलाश म्हापदी आदी मान्यवरांच्या हस्ते झाला. ठाण्यातील ३४ छायाचित्रकारांचे एकाचवेळी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
यावेळी दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेल्या १३ सदस्यीय कमिटीचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण छायाचित्रे पाहून सर्वांचे कौतुक केले. आपल्या भाषणात सर्वांचे कामाचे कौतुक करताना ना. सरनाईक यांनी नगरसेवक असताना केलेल्या आंदोलनापासून महासभेपूर्वी विषयाची पत्रकारांशी चर्चा करून कशी तयारी करत असू अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासनही देत पत्रकार संघाच्या नवीन समितीकडून होणाऱ्या कामाचे भरभरून कौतुक केले. तर आमदार संजय केळकर सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि संघाच्या संघर्ष आणि त्याच्या मेहनतीबाबत कौतुकाची थाप दिली. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पत्रकारांकडून मिळत असलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त करीत दरवर्षी विकासात्मक छायाचित्र प्रदार्शन भरविण्यासाठी भरीव तरतूद करण्याचे जाहीर केले.
दरम्यान, प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, माजी खासदार राजन विचारे, कांग्रेस शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महापालिका उपायुक्त मिनल पालांडे, शिक्षण तज्ज्ञ सुरेंद्र दिघे, वाहतुक उपायुक्त पंकज शिरसाट, जेष्ठ छायाचित्रकार ॲन्जेलो डिसिल्वा आणि प्रदीप धीवार तसेच स्नेहालय संस्था आणि जागृती पालक संस्थेचे दिव्यांग विद्यार्थी, साहित्यिक, छायाचित्रकार, विद्यार्थी, राजकिय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संघाचे कार्याध्यक्ष दीपक शेलार, उपाध्यक्ष निलेश मंडलिक, सरचिटणीस राजू डाके, चिटणीस प्रसाद सकट, खजिनदार राजेश शेटकर, सदस्य अमर राजभर, सचिन देशमाने, प्रफुल्ल गांगुर्डे, निकेश शार्दूल, गजानन हरिमकर, नितीन दुधसागर, सारिका साळूंखे, तसेच धनेश पाटील, किस्तू फर्नाडिस, समीर मार्कंडे, दीपक कुरकुंडे, मनोज सिंह यांच्यासह अनेक छायाचित्रकार, पत्रकारांनी मेहनत घेतली. ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी तसेच कुणाल भोईटे यांनी ओघवत्या शैलीत निवेदनाची धुरा सांभाळली.
चौकट – सरनाईकांचा भाजपला कानमंत्र; मित्रपक्षाची जाणीव ठेवा!
छायाचित्र प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमहापौर कृष्णा पाटील यांना प्रेमळ शब्दांत सुनावले. महासभेत सर्वपक्षीय मंजुरीनंतर करवाढीला दुसऱ्याच दिवशी भाजपने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. “आपण महायुती म्हणून सत्तेत आहोत. विरोधकांपेक्षा आपणच एकमेकांना विरोध करताना दिसतोय,” असे ते म्हणाले. महापौर नव्या असल्याने मित्रपक्ष म्हणून तसेच तुम्ही पुर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणून त्यांना सांभाळून घेतले पाहिजे, अशी आठवणही त्यांनी पाटील यांना करून दिली.
0000









WhatsApp