
यवतमाळ, दि.१० : सर्वोच्च न्यायालयाने डीजे बंदीचा निर्णय दिला असून राज्य सरकारनेही याबाबत वेळोवेळी परिपत्रक काढले आहेत. परंतू, ‘डीजे’मुक्त यवतमाळ जिल्हा करणे ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांनी ठरवले पाहिजे. तसेच डीजेच्या अतिरेकाला आळा घालून पारंपरिक पद्धतीने व शांततेत सण उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपनगराध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते
पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वत:चा अनुभव कथन करुन डीजेचे दुष्परिणाम सांगितले. ते म्हणाले, नेर, दारव्हा, दिग्रसच्या रॅलीत डीजे समोर नाचवल्यामुळे ३-४ दिवसांनी कानाला त्रास झाला, महिनाभर उपचार घ्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उत्सव साजरे करताना ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि लहान मुलांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. सण उत्सवांचा उत्साह, परंपरा आणि संस्कृती जपत सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवत उत्सव साजरे करावे. तसेच आगामी काळात डीजेच्या अतिरेकाला आळा घालून पारंपरिक, संस्कृतीला साजेशा आणि शांततामय वातावरणात उत्सव साजरे करण्यासाठी प्रशासनासोबत सर्व समाजघटकांनी सामूहिकपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले.
पारंपारिक पद्धतीने सण-उत्सव साजरा करावेत. गणेश मंडळांनी गणेशोत्सवात बँड, भजन, कीर्तन महोत्सव, आरोग्य शिबिर, डोळे तपासणी, औषध वाटप, गरीब विद्यार्थ्यांना मदत असे सामाजिक उपक्रम राबवा, असे आवाहनही त्यांनी केले.
अन्नपदार्थ भेसळीविरुद्ध कडक कारवाई करा
सण उत्सवात दूध, पनीर, मसाले, तेलात होणारी भेसळ आरोग्यासाठी घातक असून त्याविरुद्ध कडक कारवाई करावी. उत्सवात महाप्रसाद, जेवण देताना त्याचे नमुने तपासून अहवाल देण्याची व्यवस्था शासनाने केली आहे, त्याचे सर्व मंडळांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
दुष्काळाच्या संकटाचा सामना एकजुटीने करूया
अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस कमी आहे. पुढील काळात गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. सोयाबीन, कापूस पिकांच्या अवस्थेमुळे शेतकरी चिंतेत आहे. म्हणून उत्सव शांततेत साजरा करतानाच पाण्याचा योग्य वापर करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सण-उत्सव जल्लोषात करा, पण शिस्त, नियम पाळा- नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके
सण- उत्सव जल्लोषात पण शिस्त आणि नियम पाळूनच साजरा करावे. प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही प्रत्येक मंडळाची व नागरिकाची जबाबदारी आहे. सर्व मंडळांनी नियोजनबद्ध आणि एकजुटीने काम करावे. नगरपरिषदमार्फत पाणीपुरवठा व स्वच्छतेची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा प्रियदर्शनी ऊईके यांनी सांगितले.
जिल्ह्यात ‘डीजे’वर बंदी- पोलीस अधीक्षक कुमार चिंता
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट निर्देशानुसार संपूर्ण राज्यात डीजेवर १०० टक्के बंदी असून कोणतीही सूट मिळणार नाही. मंडळापर्यंत डिजे पोहोचण्याच्या आधीच नाकाबंदी करून डिजे जप्त केले जाणार आहेत. सर्व डिजे मालकांची बैठक घेऊन त्यांना कुणालाही डिजे भाड्याने देऊ नका अशी नोटीस दिली आहे. तालुका स्तरावरही ही कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सभेत सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेची माहिती त्यांनी दिली.
००००००

WhatsApp