हुतात्मा कमलाकर दांडेकर यांच्या नावाने स्मारक ओळखले जाणार; महाडच्या हुतात्मा दिनाचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी कॅबिनेटमध्ये विषय मांडणार – पालकमंत्री भरत गोगावले – महासंवाद

    - Advertisement -

    रायगड-अलिबाग,दि.१० (जिमाका):- भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह स्वातंत्र्यवीर, हुतात्मे आणि सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाचे स्मरण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी केले.

    यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री गोगावले म्हणाले की, महाडच्या हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल. १० सप्टेंबर १९४२ रोजी क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली महाड तहसील कार्यालयावर निघालेल्या किसान मोर्चावर पिंपळपार परिसरात तत्कालीन इंग्रज सरकारच्या पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात कमलाकर दांडेकर, अर्जुन भोई, वसंत दाते, नथु टेकावला आणि विठ्ठल बिरवाडकर या पंचवीरांना वीरमरण आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आयोजित ८४व्या हुतात्मा दिनानिमित्त पालकमंत्री गोगावले यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समितीने केलेल्या मागणीची दखल घेत पालकमंत्री गोगावले यांनी महाडच्या हुतात्मा स्मारकाला हुतात्मा कमलाकर दांडेकर यांचे नाव देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली. यासाठी महाड नगरपरिषदेच्या आगामी सभेत ठराव मंजूर करण्याची सूचना त्यांनी केली. या निर्णयाला कोणाचीही आडकाठी येणार नसून स्मारकाला कमलाकर दांडेकर यांचे नाव दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्मारकाच्या परिसराचे व्यापक सुशोभीकरण करण्यासाठी ५० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

    बिरवाडी येथील गार्डनमध्ये प्रस्तावित असलेल्या हुतात्मा विठ्ठल बिरवाडकर यांच्या स्मारकासाठी, तसेच महाड तालुक्यातील इतर हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व संवर्धनासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे गोगावले यांनी सांगितले. महाडच्या हुतात्मा दिनाचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, ही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीचीही पालकमंत्र्यांनी दखल घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्याने पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याबरोबरच तो सीबीएसई अभ्यासक्रमातही घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर महाडच्या हुतात्मा दिनाचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याबाबत लवकरच कॅबिनेट बैठकीत विषय मांडून निर्णय घेण्यात येईल, असा शब्द गोगावले यांनी महाडकरांना दिला.

    स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समिती, रायगड जिल्हा परिषद आणि महाड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी हुतात्मा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाड नगरपरिषद शाळा क्रमांक ४ येथून हुतात्म्यांच्या प्रतिमांना अभिवादन करून भव्य रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी महाड शहर दुमदुमून गेले. बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारकापर्यंत निघालेल्या या रॅलीदरम्यान शहरातील विविध चौकांमध्ये असलेल्या हुतात्म्यांच्या नामफलकांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

    उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे उपकार कधीही विसरता कामा नयेत, असे सांगितले. महाडच्या क्रांतीचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी तो पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची तसेच हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाडच्या हुतात्मा स्मारकाला कमलाकर दांडेकर यांचे नाव देण्याचा ठराव पालिकेत सर्वानुमते मंजूर होईल आणि पुढील वर्षीचा हुतात्मा दिनाचा कार्यक्रम हुतात्मा कमलाकर दांडेकर स्मारकात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समितीच्या वतीने श्रीकृष्ण बाळ यांनी प्रास्ताविक करताना हुतात्मा स्मारकाला कमलाकर दांडेकर यांचे नाव देणे, स्मारक परिसरातील मुख्याधिकारी निवासस्थान पाडून त्या जागी भव्य हुतात्मा स्मारक उभारणे आणि महाड हुतात्मा दिनाचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणे, या प्रमुख मागण्या मांडल्या.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर शेठ यांनी केले तर आभार नितीन पावले यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भुस्कुटे, माई पोतदार, पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडीक, उपनगराध्यक्ष संदीप जाधव, तहसीलदार महेश शितोळे, डीवायएसपी प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे, गटविकास अधिकारी साळुंखे, तसेच नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

    0000000

    - Advertisement -