
नंदुरबार, दि. १० : तळागाळातील जनतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचवावा. तसेच जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तळोदा येथील सहायक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या याहा मोगी सभागृहात विविध विकासकामे व शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ,यावेळी आमदार राजेश पाडवी, उपनगराध्यक्ष शीतल पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी पूर्णत्वास येत असलेल्या योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बचतगटांना वित्तपुरवठा उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. आयुष्मान भारत कार्ड वितरणाला गती देऊन पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांना गती देऊन कामे वेळेत पूर्ण करावीत. शैक्षणिक क्षेत्रातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करावी. तसेच शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तळोदा शहरातील मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. पीक कापणी प्रयोग सुरू करावेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दूध उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. बंद असलेले विद्युत ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून शेतकऱ्यांना विना व्यत्यय वीजपुरवठा मिळेल, असे नियोजन करावे. वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बैठकीत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), प्रधानमंत्री घरकुल योजना, ग्रामीण पाणीपुरवठा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जल जीवन मिशन, हर घर जल, वीज वितरण, वन विभाग आदींसह विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून द्यावा तसेच विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
00000

WhatsApp