
मुंबई, दि. ८: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारा एक प्रतिभावान कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून विविध भूमिका अजरामर केल्या. त्यांच्या अभिनयातील सहजता, संवादफेक आणि व्यक्तिरेखेला जिवंत करण्याची विलक्षण हातोटी यामुळे त्यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.
कलेसोबतच सामाजिक बांधिलकीही त्यांनी तितक्याच संवेदनशीलतेने जपली. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून जलसंधारण, जलसंवर्धन तसेच शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. समाजातील गरजू घटकांच्या प्रश्नांशी जोडून घेत त्यांनी सामाजिक कार्याला दिलेले योगदानही कायम स्मरणात राहील.
कलेच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देणारा संवेदनशील कलाकार आपण गमावला आहे. त्यांच्या कार्याची आणि कलाकृतींची आठवण सदैव प्रेरणादायी राहील.
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात आपण सहभागी असून, हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे मंत्री संजय राठोड यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
००००

WhatsApp