दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविण्याचे नियोजन – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २० : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन ग्रामीण भागात पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात ‘वॉटर कप’ स्पर्धा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नुकतीच राज्यस्तरीय कार्यकारी समितीची बैठक मंत्रालयात पार झाली.

    या बैठकीत राज्यात वॉटर कप स्पर्धा सुरू करण्याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. स्पर्धेचे स्वरूप, अंमलबजावणीची कार्यपद्धती, विविध विभागांचा सहभाग तसेच आवश्यक प्रशिक्षण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांना आणि संबंधित घटकांना आवश्यक प्रशिक्षण देणे, त्यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन करणे तसेच विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे या बाबींवर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

    जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविणे, गावपातळीवर पाण्याचे नियोजन आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. पाणी फाउंडेशनच्या अनुभवाचा उपयोग करून राज्यात व्यापक स्तरावर जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे.

    या बैठकीस जलसंपदा विभाग प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जलसंपदा विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे पाणी फाउंडेशनचे आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, एटीई चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा सहभागी झाले होते.

    0000

    गजानन पाटील/विसंअ

     

    - Advertisement -