मेळघाटातील लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    - Advertisement -

    • जारीदा वीज उपकेंद्रालाही दिली भेट

    अमरावती, दि. २० : एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी पालकांनी मुलींना आग्रहाने शिकवावे, बालविवाहाला पुढाकार घेऊन कृतीतून आळा घालावा. शिक्षणासोबतच आर्थिक प्रगती करून मेळघाटातील लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्यात येईल, असा विश्वास महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज महिला संवाद कार्यक्रमात व्यक्त केला.

    राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या उपस्थितीत चुरणी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात महिला संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार केवलराम काळे, अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली माथने, प्रभुदास भिलावेकर, आरोग्य उपसंचालक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारीसे उपस्थित होते.

    राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी,राज्य व केंद्र शासनाच्या महिला आणि बालकांसाठी विविध योजना राबविण्यात येते. या कल्याणकारी योजना आणि कार्यक्रमांमुळे मेळघाटातील महिला व बालमृत्यू दरात घट झाली आहे. या भागातील संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण उत्तमरित्या वाढले आहे. गरोदर महिलांना प्रसुतीपूर्व आणि पश्चात सकस आहार व उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांसह आशा, अंगणवाडी सेविका दुर्गम भागातही घरोघरी जाऊन योजना प्रभावीपणे पोहचवित आहेत. या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता आणि नवजात बालकांची काळजी घेण्यात येत आहे.

    राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी योजनां’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येत आहे. महिलांना वार्षिक १ ते ५ लाखांचे उत्पन्नlचे साधन मिळवून देत देशातील ३ कोटी महिलांना लखपती दिदी बनविण्याची महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे.राज्यातही ५० लाख लखपती दिदी बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या कार्याला अधिक गती देऊन प्रभावी अंमलबजावणीतून लखपती दिदी निर्माण करण्यावर भर देण्यात येईल.

    यावेळी आमदार श्री. काळे,  नगराध्यक्ष श्रीमती माथने, श्री. भिलावेकर यांनी मार्गदर्शन केले. काटकुंभ येथील साई महिला बचत गटाच्या प्रमुख सरोजनी नागले,काजलडोह येथील आशा गट प्रवर्तिका मालती ऊईके, चुरणी येथील अंगणवाडी सेविका शिला सुखदेवे यांनी मनोगत व्यक्त केले.

    सुरूवातीला स्थानिक महिला व पुरुषांनी पारंपरिक आदिवासी नृत्याद्वारे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांचे स्वागत केले. तत्पूर्वी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तसेच जारीदा येथील ३३ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राला भेट दिली. चुरणी गावातील दोन अंगणवाड्या आणि आरोग्य वर्धिनी आशा उपकेंद्रालाही भेट देऊन पाहणी केली.

    ००००००

    - Advertisement -