पीएम-सेतू योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाण्यात ‘उद्योग संवाद’ मेळावा – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २२ : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड आयटीआय (पीएम-सेतू) उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आयबिस हॉटेल, ठाणे येथे ‘उद्योग संवाद’ मेळावा  सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला. उद्योग क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबईचे सहसंचालक अजित शिंदे यांनी केले आहे.

    औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) आधुनिकीकरण, उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळाची निर्मिती, प्रशिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि प्रशिक्षणार्थ्यांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे हा पीएम-सेतू उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. उद्योग आणि व्यावसायिक शिक्षण संस्था यांच्यातील समन्वय दृढ करून कौशल्य विकास प्रक्रियेला उद्योगाभिमुख स्वरूप देण्यावर मेळाव्यात भर राहणार आहे.

    मेळाव्यासाठी विविध क्षेत्रांतील नामांकित औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योग संघटनांचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे. पीएम-सेतू योजनेची उद्दिष्टे व अंमलबजावणी, उद्योगांचा सहभाग, आयटीआयच्या पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण, अभ्यासक्रमांतील सुधारणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत माहिती दिली जाणार आहे.

    उद्योग प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष चर्चा सत्र होणार आहे. उद्योगांच्या अपेक्षा, सूचना व अडचणी जाणून घेऊन प्रभावी अंमलबजावणीच्या उपाययोजनांवर विचारविनिमय केला जाईल. संचालनालय आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढविणे, संयुक्त उपक्रम राबविणे तसेच आवश्यकतेनुसार सामंजस्य करार करण्याच्या शक्यतांवरही चर्चा होणार आहे.

    उद्योगांच्या सक्रिय सहभागातून प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. या उपक्रमामुळे राज्यातील आयटीआयची गुणवत्ता वाढण्यास, उद्योगांना योग्य कुशल मनुष्यबळ मिळण्यास तसेच महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

    0000

    संध्या गरवारे/विसंअ

    - Advertisement -