
मुंबई, दि. ८ : राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ, सुव्यवस्थित आणि कालबद्ध करण्यासाठी वार्षिक भरती वेळापत्रक तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री (गृह) योगेश कदम यांनी दिले. उमेदवारांना भरती प्रक्रियेची निश्चित माहिती मिळून पूर्वतयारीसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा, यासाठी भरती प्रक्रियेचे नियोजन अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०२५-२६ मधील पोलीस भरती प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस आमदार बच्चू कडू (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) कृष्ण प्रकाश यांच्यासह गृह विभाग आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भरती प्रक्रियेच्या प्रारंभिक टप्प्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना कराव्यात तसेच शासनस्तरावर आवश्यक निर्णय व मान्यता घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, असे निर्देश कदम यांनी दिले.
विविध स्पर्धा परीक्षा तसेच केंद्र शासनाच्या सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लक्षात घेऊन पोलीस भरतीतील लेखी परीक्षा व मैदानी चाचणीचे नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी व नियुक्ती प्रक्रिया अधिक सुसूत्र करण्यासह विविध पोलीस युनिटमधील रिक्त पदांचे नियोजन आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर वेळेत भरती करण्याबाबतही आढावा घेण्यात आला.
राज्यातील १० पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता, प्रशिक्षणार्थींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व अधोसंरचना बळकटीकरण, महिला भरतीला मिळालेला प्रतिसाद, तसेच एसआरपीएफ, कारागृह विभाग, होमगार्ड आरक्षण, अनुकंपा नियुक्त्या आणि इतर संवर्गांतील भरती प्रक्रियेचा समन्वय याबाबतही चर्चा झाली. भरती प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, ऑनलाइन अर्ज प्रणाली, निवड प्रक्रिया, पारदर्शकता, गुणवत्ता आणि प्रशासकीय कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री कदम यांनी दिले.
0000

WhatsApp