जालना, दि. ८ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मागील दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची सोमवारी मध्यरात्री जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली व सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाच्या विशेष पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. उपोषणामुळे श्री. जरांगे पाटील यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब कमी झाल्याचे तसेच त्यांचे वजन घटल्याचे तपासणीत आढळून आले.
श्री. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड तसेच जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून श्री. जरांगे पाटील यांना सलाईन घेण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करत श्री. जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार घेण्यास संमती दिली. त्यानंतर त्यांना मध्यरात्री चार व आज दिवसभरात दोन सलाईन लावण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
00000

WhatsApp