
सिंधुदुर्ग, दि. २१ (जिमाका): देशाची सुरक्षा, नागरिकांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्य बजावताना प्राणार्पण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचे स्मरण करण्यासाठी आज पोलीस शहीद स्मृतिदिन पाळण्यात आला. यानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित कार्यक्रमात राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलिसांना विनम्र अभिवादन केले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने संचलन करून हुतात्म्यांना सलामी देण्यात आली. तसेच बंदुकीच्या फैरी झाडून वीर जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते, त्यांनीही हुतात्मा स्मारकास अभिवादन केले.

21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग येथे देशाच्या सीमांचे रक्षण करताना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस शहीद स्मृतिदिन पाळण्यात येतो. यानिमित्त 1 सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशातील विविध पोलीस दलांमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस शहीद स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा पोलिसांच्या पवित्र स्मृतींना अभिवादनपर संदेश दिला. देशाची सुरक्षा, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र पार पाडतात. नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती तसेच विविध आव्हानांच्या काळातही पोलीस दल महत्त्वाची भूमिका बजावते. कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या या वीरांचे शौर्य, धैर्य आणि समर्पण देशासाठी अभिमानास्पद असून त्यांचे बलिदान भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रति आदर व्यक्त करण्यात आला. देशसेवेसाठी आपल्या प्रियजनांचे सर्वोच्च बलिदान स्वीकारणाऱ्या कुटुंबीयांच्या त्यागाचे स्मरण करून हुतात्मा पोलिसांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. पोलीस शहीद स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या शौर्याचा, कर्तव्यनिष्ठेचा आणि समर्पणाचा आदर्श सदैव स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
००००

WhatsApp