
छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (जिमाका): मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण, मानवंदना, शहीदस्मारकास अभिवादन करण्यात आले. मराठवाडा मक्तीसंग्राम दिन आज मोठ्या उत्साहात साजरा झाला.

सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित या सोहळ्यास सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, अंबादास दानवे, सुहास शिरसाट, रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल, प्रशांत बंब, विलास भुमरे, नारायण कुचे, श्रीमती अनुराधा चव्हाण, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मुक्तिसंग्राम सैनिक, त्यांचे कुटूंबीय, शासकीय अधिकारी- कर्मचारी, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी शहीद स्मारकास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तसेच राष्ट्रध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणाच्या प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित केली.
मुक्तीसंग्रामातील योद्ध्यांचे स्मरण
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेकांच्या बलिदानामुळेच खऱ्या अर्थाने मराठवाडा मुक्त झाला आहे. त्यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक प्रचंड मोठी लढाई उभारली त्यातून आपला मराठवाडा मुक्त झाला. त्यावेळी अत्याचाराची परिसिमा झाली होती. अशा प्रकारच्या अवस्थेतून या मराठवाड्याला बाहेर काढण्याचे काम हे आपल्या स्वातंत्र्यसंग्रामसेनानींनी केले. त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना सर्वप्रकारची मदत
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठवाडा सातत्याने संघर्ष करतोय. विकासाचा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. दुष्काळाचे संकट हे सातत्याने घोंगावताना दिसते. यंदाचे वर्ष देखील दुष्काळाचे वर्ष आहे. पावसाचा मोठा खंड पडला आणि मोठ्या प्रमाणात शेतीचं, पिकांचं नुकसान झाले. आमचा शेतकरी चिंतेत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत आपण देऊ. पंचनाम्यांची प्रक्रिया ५ ऑक्टोबरनंतर पूर्ण करुन आम्ही शेतकऱ्यांना मदत करु. पिण्याचे पाणी, चारा अशी सगळी व्यवस्था आणि नियोजन केलं आहे.

कर्जमुक्तीचा लाभ, जुनी वीजबीले रद्द
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली. या योजनेचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलाय.आतापर्यंत १५ लाखांच्या वर शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहेच शिवाय आता जवळपास ४८ हजार कोटी रुपयांची, जुनी वीज बिल रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू न देण्याचा संकल्प
मराठवाड्याच्या दुष्काळीस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र म्हणाले की, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला; पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही हा संकल्प आम्ही केला आहे. आणि त्या दृष्टीने अतिशय वेगाने वाटचाल सुरु आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी भीमा खोऱ्यातून अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यामध्ये आणायचं काम आता सुरू करत आहोत. यामुळे धाराशिव, बीड आणि लातूरच्या भागापर्यंत पाणी आणता येईल. तसेच गोदावरीच्या खोऱ्यामध्ये उल्हास खोऱ्यातून, कोकणातून पाणी उचलून आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. अंदाज असा आहे की, जवळपास ७० टीएमसी पाणी उल्हास खोऱ्यातून हे गोदावरीच्या खोऱ्यात आपल्याला आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. टप्प्याटप्प्यानं; सात वर्षात हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक घरी दररोज पाणी
शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचं काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. निधीची कमतरता पडू दिली नाही. वेगाने काम चाललेले आहे. अडचणी आपण दूर करतो आहोत. लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचं पाणी येईल. त्याकडे आपली वाटचाल ही सुरू झाली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशातील मोठी उद्योग वसाहत
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये पश्चिम उन्नत द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गामुळे शेंद्रा-बिडकीनसारख्या औद्योगिक वसाहती, डीएमआयसीसारखं क्लस्टर आता देशातलं प्रमुख क्लस्टर झालंय. या ठिकाणी टोयोटा, जेएसडब्ल्यू, एथर या सारख्या कंपन्यांमुळे पुढच्या काळात देशामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक व्हेइकल्स मॅन्युफॅक्चरिंग करणारं क्लस्टर हे छत्रपती संभाजीनगरचं क्लस्टर असणार आहे आणि एक वेगळा सन्मान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्योग क्षेत्राचा विस्तार
उद्योग विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येतेय आणि या गुंतवणुकीला अनुरूप आता आपण इन्फ्रास्ट्रक्चरदेखील तयार करतो आहोत. अजून ८,००० एकर जागा त्या ठिकाणी अधिग्रहित करून आपली औद्योगिक वसाहत आपण मोठी करत आहोत. या संपूर्ण गुंतवणुकीमुळे आपल्याकडे रोजगाराची निर्मिती होतेय आणि या रोजगारातून समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न मराठवाड्यात होत आहे,असे त्यांनी सांगितले.
सक्षम आणि जलद दळणवळण
उद्योगाच्या परिसंस्था विकासासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जालना ड्रायपोर्टचं काम आता सुरू झालंय. आपल्याकडे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या आवश्यक आयात निर्यातीची सुविधा या ड्रायपोर्टवरुन करण्यात आली आहे. तसेच संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातही आपल्याला चांगला वाव आहे. त्यासाठी आपण शेंद्रा-बिडकीन आणि बिडकीन-ढोरेगाव हे दोन रस्ते सहा पदरी करतोय. त्याकरता साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातला सगळ्यात लांब उन्नत रस्ता आपण तयार करतो त्यामुळे कुठलाही ट्रॅफिक जॅम पुढच्या काळामध्ये होणार नाही,असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य सुविधांचा विकास
आरोग्य सुविधांच्या विकासाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ७१० कोटी रुपयांच्या नवीन इमारतीची उभारणी, धाराशिवमध्ये एक ५०० खाटांचे अद्यावत रुग्णालय, मेडिकल कॉलेज असेल, किंवा परळीमध्ये ५६५ कोटी रुपये खर्चून पशुवैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक सुविधांच्या विकासाचे काम आपण सुरु केले आहे.
सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तन
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठवाडा हा आकांक्षी प्रदेश आहे. अनेक अडचणींचा सामना करणारा प्रदेश आहे.सगळ्यांना सोबत घेऊन मराठवाड्याला विकासाच्या वाटेवर आणण्याचे आणि परिवर्तित करण्याचे कार्य आपण सुरू केले आहे. समाजातल्या सर्व घटकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनआणण्याचा प्रयत्न सुरु आहे,असे त्यांनी आश्वस्त केले. मुख्यमंत्र्यांनी मुक्तीसंग्राम सैनिक, त्यांचे कुटुंबियांच्या भेटी घेतल्या. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे आणि प्रवीणा कन्नडकर यांनी केले.
०००

WhatsApp