
मुंबई, दि. ९ : आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यातील शासकीय व अनुदानित अशा एकूण १,०५८ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची अचूकता तपासण्यासाठी एकाच दिवशी विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ५०० शासकीय आणि ५५८ अनुदानित आश्रमशाळांचा समावेश होता. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि शालेय अभिलेखांतील नोंदी यांची पडताळणी करण्यासाठी आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.
आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी ३० सप्टेंबर २०२६ अखेरच्या विद्यार्थी पटसंख्येच्या अनुषंगाने विशेष पटपडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.
पटपडताळणीदरम्यान प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची वर्गनिहाय व तुकडीनिहाय स्वतंत्र मोजणी करण्यात आली. तसेच, संबंधित विद्यार्थ्याचे नाव शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये नोंदविले असल्याची खात्री करण्यात आली. मोजणीच्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला उभे करून त्याचे पूर्ण नाव विचारण्यात आले. त्यानंतर वर्गहजेरीमध्ये विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवून शालेय नोंदवहीतील माहिती आणि प्रत्यक्ष उपस्थिती यांची पडताळणी करण्यात आली. ही प्रक्रिया शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य
आश्रमशाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची अचूक पटसंख्या व प्रत्यक्ष उपस्थिती निश्चित करणे महत्वाचे आहे. विशेष पटपडताळणी मोहिमेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थी नोंदींची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास आणि शैक्षणिक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी दिली.
दुबार मोजणी टाळण्यासाठी विशेष दक्षता
पटपडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर निळ्या शाईच्या मार्करने निशाणी करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची दुबार मोजणी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. तसेच, तपासणीदरम्यान गैरहजर आढळलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली.
00000
आश्विनी पुजारी/विसंअ

WhatsApp