राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग परराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्कात; १९ सदस्यीय न्यायवैद्यक पथक काठमांडू येथे

- Advertisement -


मुंबई, दि. १ :- चीन, तिबेट आणि नेपाळच्या पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील व्यवस्था ही उद्ध्वस्त झाले आहे. नैसर्गिक अडचणींवर मात करून बचाव व मदतकार्य सुरू आहे. ३१ ऑगस्ट अखेर पर्यंत प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातून 406 नागरिक आपत्तीमध्ये अडकले होते यापैकी रिचा टूर्स तर्फे गेलेले 60 आणि अन्य चार पर्यटक नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारताची बचाव पथके घटनास्थळी तैनात असून हरवलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. राज्य आपत्कालीन नियंत्रण केंद्र ( एसईओसी ) परराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाशी नियमित संपर्कात आहे.

नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार पर्यटक नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला वेग आला असून मृतांची ओळख पटविण्यासाठी १९ सदस्यीय न्यायवैद्यक पथक काठमांडू येथे दाखल झाले आहे. यामुळे संबंधित कुटुंबीयांना त्यांच्या आप्तस्वकीयांबाबत अधिकृत माहिती मिळण्यास मदत होईल. परराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाशी सातत्याने समन्वय साधला जात असून अडकलेल्या नागरिकांची माहिती अद्यावत केली जात आहे. अद्ययावत माहिती परराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाला पाठविण्यात येत आहे.

प्रतिकूल हवामानातही बचावकार्य सुरू

भारताकडून पाठविण्यात आलेल्या १९ सदस्यीय विशेष न्यायवैद्यक पथकाने काठमांडूमध्ये काम सुरू केले आहे. नेपाळमध्ये प्राप्त होणाऱ्या डीएनए नमुन्यांच्या तपासणी व विश्लेषणाला या पथकाच्या माध्यमातून अधिक बळ मिळणार असून, मृत व्यक्तींची ओळख पटविण्याच्या प्रक्रियेला मदत होणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे. भारताचे राजदूत यांनी न्यायवैद्यक पथकाची भेट घेऊन त्यांच्या कामाची माहिती घेतली आणि आवश्यक सहकार्याबाबत चर्चा केली. त्यानंतर भारतीय पथकाने काठमांडू येथील नेपाळ पोलिसांच्या केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील अधिकारी तसेच त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागातील तज्ज्ञांशी चर्चा केली.

भारताचे बोगदा बचाव पथक आजही नेपाळच्या लष्करासोबत शोध व बचाव कार्यात सहभागी झाले.

००००

किरण वाघ/विसंअ

 

 



Source link

- Advertisement -